महापौरपदासाठी अर्ज दाखल
By Admin | Updated: July 7, 2017 04:28 IST2017-07-07T04:28:09+5:302017-07-07T04:28:09+5:30
पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी कोण विराजमान होणार? याची अनेकांना प्रतीक्षा लागली होती. गुरुवारी भाजपातर्फे डॉ. कविता

महापौरपदासाठी अर्ज दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी कोण विराजमान होणार? याची अनेकांना प्रतीक्षा लागली होती. गुरुवारी भाजपातर्फे डॉ. कविता चौतमल, तर शेकापतर्फे हेमलता गोवारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पक्षीय बलाबल पाहिले असता, भाजपाच्या डॉ. कविता चौतमल यांच्या नावाचे पारडे जड आहे. सोमवार, १० जुलै रोजी विशेष महासभेत त्यांच्या नावाची घोषणा होईल. उपमहापौरपदासाठी भाजपाच्या पनवेल नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष चारुशीला घरत तर शेकापच्या वतीने रवींद्र भगत यांनी अर्ज दाखल केला आहे.
पनवेल पालिकेची निवडणूक २४ मे रोजी पार पडली. यात ७८पैकी ५१ जागा भाजपाला मिळाल्याने भाजपाची एकहाती सत्ता पनवेल महापालिकेत आली. शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाआघाडीला २७ जागा मिळाल्या. भाजपाच्या गोटातून महापौर होणार हे त्या वेळी पक्के झाले होते. मात्र, विविध कारणांमुळे ही निवडणूक एक महिन्याहून अधिक कालावधी उलटला, तरी लांबणीवर पडली होती. त्यात भाजपाच्या वतीने महापौरपदाच्या उमेदवारांची नावे गुप्त ठेवली होती. मात्र, डॉ. कविता चौतमल यांच्या नावाची चर्चा होती. भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या आरपीआयमधून भाजपाच्या कमळावर निवडून आलेल्या आरपीआय जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड यांच्या बहीण विद्या गायकवाड यांचे नावही शर्यतीत होते. मात्र, अखेर चौतमल यांना पक्षाने उमेदवारी दिल्याने पनवेलच्या महापौरपदाचे चित्र स्पष्ट झाले आहे. डॉ. कविता चौतमल या पेशाने डॉक्टर असून, त्यांचे पती किशोर चौतमल हे आमदार प्रशांत ठाकूर यांचे निकटवर्तीय असल्याचे बोलले जात आहे. डॉ. चौतमल या प्रभाग १६मधून निवडून आल्या आहेत. शेकापमधून हेमलता गोवारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गोवारी या कामोठे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच आहेत.
पनवेल महानगरपालिकेची विशेष महासभा सोमवार, १० जून रोजी आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडणार आहे. या वेळी पीठासीन अधिकारी निवडणुकीच्या आधारे महापौरांची घोषणा करतील. महापौर, उपमहापौरपदाच्या उमेदवारी अर्जासह स्वीकृत नगरसेवकपदाच्या उमेदवारांनीदेखील अर्ज दाखल केले आहेत.