पनवेलच्या पुलाला आले वाहनतळाचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 23:52 IST2020-12-18T23:52:28+5:302020-12-18T23:52:32+5:30
वडघर-करंजाडे येथील एका पुलाची स्थिती; हातगाड्यांच्या रांगा

पनवेलच्या पुलाला आले वाहनतळाचे स्वरूप
नवीन पनवेल : पनवेल-उरण रस्त्यावर असलेल्या वडघर-करंजाडे येथील एका पुलावर वाहन पार्किंग तर दुसऱ्या पुलावर हातगाड्यांची रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. त्यामुले दोन्ही पुलाला सध्या वाहनतळस्वरूप प्राप्त झाले आहे.
पनवेलच्या उरण नाका येथे मच्छी मार्केटच्या पुढे खाडीजवळ या पुलाला सुरुवात होते. उरणच्या दिशेने वडघर पाशी आणि करंजाडेकडे जाणाऱ्या रस्त्यापाशी हा पूल संपतो. ब्रिटिशांच्या काळात बांधण्यात आलेला पनवेल येथील वडघर-करंजाडे येथील एक पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र, या पुलाचा उपयोग वाहन पार्किंगसाठी केला जात आहे. जुनाट झालेल्या या पुलावरून कित्येक वर्षापासून वाहतूक सुरू होती. मात्र, महाड येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर बांधकाम विभागाकडून ९० वर्षे जुना झालेल्या या पुलावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पूर्वीच्या कमकुवत झालेल्या जुन्या पुलाला पर्याय म्हणून याठिकाणी बाजूला नवीन पुलाची बांधणी करण्यात आली. मात्र, वाहतुकीसाठी बंद केलेल्या पुलावर चारचाकी गाड्या, मोठे टेम्पो या ठिकाणी दिवस रात्र उभ्या केलेल्या असतात. त्यामुळे वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे.