कोपरखैरणेत फेरीवाल्यांवर केला कारवाईचा दिखाऊपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 23:50 IST2020-12-18T23:50:34+5:302020-12-18T23:50:38+5:30
पालिकेची धूळफेक; कमिटीच्या आगमनापूर्वी रस्ते स्वच्छ, नंतर जैसे थे

कोपरखैरणेत फेरीवाल्यांवर केला कारवाईचा दिखाऊपणा
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : शहरात अनधिकृत फेरीवाल्यांची समस्या वाढत चालली आहे. त्यावर केवळ स्वच्छता सर्व्हेक्षणाच्या कालावधीतच कारवाया होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तात्पुरती स्वच्छता करून पुरस्कार पटकावण्याचा डाव पालिका अधिकारी रचत असल्याचे उघड होत आहे.
महापालिकेला नुकताच स्वच्छता सर्वेक्षणात देशात तिसरा व राज्यात पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. अशातच पुन्हा एकदा शहर स्वच्छता सर्वेक्षणासाठी पालिका सज्ज झाली आहे. त्याकरिता विभागनिहाय पाहणी सुरू आहे. मात्र, या पाहणी कमिटीच्या आगमनापूर्वी रस्ते व परिसर स्वच्छ केले जात असून, त्यांनी पाठ फिरवताच परिस्थिती तशीच पाहायला मिळत आहे. पालिकेची फेरीवाल्यांवर होणारी कारवाई दिखाऊ असल्याचा संताप नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
कोपरखैरणे सेक्टर १५ ते १८ दरम्यानच्या रस्त्यावरील अतिक्रमण वाढतच चालले आहे. प्रत्येक विभागात राखीव भाजीपाला मार्केटच्या बाहेरचे रस्ते फेरीवाल्यांची बळकावले आहेत. सातत्याने तक्रार होऊनही तिथले रस्ते मोकळे होऊ शकलेले नाहीत. मात्र, मंगळवारी या विभागाचा पाहणी दौरा होणार असल्याने संपूर्ण रस्ता फेरीवाला मुक्त करून साफसफाई करण्यात आली. त्यामुळे काही तासासाठी का होईना, रस्त्याने मोकळा श्वास घेतला होता. मात्र, दुसऱ्याच दिवशी पुन्हा तिथे बाजार बसल्याचे पाहायला मिळाले. यावरून केवळ पाहणी कमिटीच्या स्वागतासाठी शहर स्वच्छ होत असल्याचे उघड होत आहे, परंतु केवळ पुरस्कार पटकावण्याची दिखाव्यासाठी तात्पुरती कारवाई न करता कायमस्वरूपी शहर फेरीवाला मुक्त करून स्वच्छ करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
शहराबाहेरच्यांना मिळतोय राजकीय वरदहस्त
कोपरखैरणे, वाशी, ऐरोली, नेरुळ विभागात अनधिकृत फेरीवाले मोठी समस्या बनले आहेत. बहुतांश फेरीवाले शहराबाहेरचे असून, त्यांना काही अधिकाऱ्यांसह राजकीय वरदहस्त लाभत आहे.
यामागे मोठ्या प्रमाणात अर्थकारण शिजत आहे. त्याच उद्देशाने फेरीवाल्यांकडे कारवाईकडे कानाडोळा होत असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यात सिडको व पालिका अधिकारीही संगनमताने उद्देश साध्य करून घेत असल्याचा आरोप होत आहे.