Antigen test of 321 passengers at Panvel railway station; Two passengers left Corona positive | पनवेल रेल्वे स्थानकावर ३२१ प्रवाशांची अँटिजेन टेस्ट; दोन प्रवासी निघाले कोरोना पॉझिटिव्ह

पनवेल रेल्वे स्थानकावर ३२१ प्रवाशांची अँटिजेन टेस्ट; दोन प्रवासी निघाले कोरोना पॉझिटिव्ह

वैभव गायकर

पनवेल : कोविडचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी शासनाने वेळोवेळो विविध निर्बंध लागू केले आहेत. याचाच भाग म्हणून रेल्वे व रस्ते वाहतूक करणाऱ्या प्रवाशांची कोविड टेस्ट करण्याचे राज्य शासनाने निश्चित केल्यानंतर संबंधित कोविड टेस्टला सुरुवात झाली आहे. परराज्यातून लांब पल्ल्याच्या गाड्यांतून येणाऱ्या प्रवाशांची कोविड टेस्ट केली जात आहे. पनवेल रेल्वे स्थानकावर याकरिता पनवेल महानगरपालिकेच्या दोन टीम कार्यरत आहेत.

शुक्रवारी मध्यरात्रीपासून लांब पल्ल्याच्या विशेषतः दिल्ली, गुजरात, राजस्थान, गोवा आदी ठिकाणांहून येणाऱ्या ट्रेनमधील प्रवाशांची तपासणी करून या प्रवाशांची अँटिजेन टेस्ट केली जात आहे. दोन दिवसांत ३२१ प्रवाशांची कोविड टेस्ट करण्यात आली असून यापैकी दोन प्रवासी कोविड पॉझिटिव्ह निघाले असल्याची माहिती पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी दिली. 

लोकल स्तरावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या प्रवाशांची टेस्ट यामध्ये केली जात नसल्याचे गोसावी यांनी स्पष्ट केले. दोन पथकांत प्रत्येकी चार असे एकूण आठ कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत. यामध्ये एक वैद्यकीय अधिकारी, टेक्निशियन, फार्मासिस्ट आणि सिस्टरचा समावेश आहे.  शासनाच्या निर्देशानुसार शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या या तपासणीत पहिल्या दिवशी १७६ जणांची तपासणी करण्यात आली. तर दुसऱ्या दिवशी १४५ जणांची तपासणी करण्यात आली आहे. तपासणीदरम्यान ज्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असले तरी ज्यांच्यामध्ये सौम्य लक्षणे आढळत आहेत अशा प्रवाशांना होम क्वारंटाईनचा सल्ला दिला जात असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी दिली. पनवेल पालिकाक्षेत्रात दिवाळीनंतर पुन्हा कोरोना रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे काळजी म्हणून रेल्वे स्थानकांवर चाचण्या होत आहेत. 

पालिकेचे आदेश
रेल्वे स्थानकावरील स्टेशनमास्तरच्या माध्यमातून लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक आम्हाला प्राप्त झाल्यानंतर पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही संबंधित प्रवाशांची तपासणी करून लक्षणे आढळलेल्या प्रवाशांची टेस्ट करीत असल्याचे डॉ. गोसावी यांनी सांगितले.

Web Title: Antigen test of 321 passengers at Panvel railway station; Two passengers left Corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.