फ्लेमिंगो विमान दुर्घटनेच्या आठवणी झाल्या ताज्या, भरकटलेले ३९ पक्षी घाटकोपरमध्ये दगावले होते
By नारायण जाधव | Updated: June 13, 2025 06:00 IST2025-06-13T06:00:24+5:302025-06-13T06:00:49+5:30
Ahmedabad Air India Flight AI171 Crash : अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर मागील वर्षी २० मे रोजी दुबईच्या विमानाला फ्लेमिंगोना धडकून झालेल्या अपघाताच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. दुबईहून मुंबईत येणाऱ्या एमिरेट्स कंपनीच्या विमानाला घाटकोपर येथे रात्री ८:४० वाजता फ्लेमिंगो पक्ष्यांचा एक थवा धडकल्याने ३९ फ्लेमिंगोंचा मृत्यू झाला होता.

फ्लेमिंगो विमान दुर्घटनेच्या आठवणी झाल्या ताज्या, भरकटलेले ३९ पक्षी घाटकोपरमध्ये दगावले होते
- नारायण जाधव
नवी मुंबई - अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर मागील वर्षी २० मे रोजी दुबईच्या विमानाला फ्लेमिंगोना धडकून झालेल्या अपघाताच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. दुबईहून मुंबईत येणाऱ्या एमिरेट्स कंपनीच्या विमानाला घाटकोपर येथे रात्री ८:४० वाजता फ्लेमिंगो पक्ष्यांचा एक थवा धडकल्याने ३९ फ्लेमिंगोंचा मृत्यू झाला होता. यामध्ये विमानातील ३१० प्रवासी बचावले होते.
नवी मुंबईतील टीएस चाणक्य, डीपीएस लेकसह ठाणे खाडी परिसरातील फ्लेमिंगोंच्या अधिवासावर होत असलेल्या अतिक्रमणामुळे हे पक्षी भरकटले आणि त्यातूनच घाटकोपरचा अपघात घडला असावा, असा अंदाज तेव्हा वर्तवण्यात आला होता. पक्ष्यांच्या धडकेने हे विमान कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. मात्र, सुदैवाने विमान वैमानिकांच्या नियंत्रणात राहिले.
...म्हणून डीपीएस लेक झाले संरक्षित क्षेत्र
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन महिन्यांपूर्वी डीपीएस लेक संरक्षित क्षेत्र घोषित म्हणून केले. यानंतर फ्लेमिंगोंचा मोठा अधिवास असलेल्या याच परिसरातील टीएस चाणक्य, एनआरआय पाणथळींनाही संरक्षित करण्याची मागणी होत आहे. त्यांचा नवी मुंबई विमानतळावरून ये-जा करणाऱ्या विमानांना धोका निर्माण होऊ शकतो, असे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने आपल्या अहवालात म्हटलेले आहे.
चौकशी अहवाल गुलदस्त्यात
फ्लेमिंगोना धडकून झालेल्या विमान अपघाताच्या घटनेचा तपास वन विभागाने केला होता. मात्र, त्याचा अहवाल मात्र वनविभागाने अद्याप उघड केलेला नाही.