बोनससाठी उद्यान कर्मचाऱ्यांचे आंदोलन, उपायुक्तांच्या दालनात ठिय्या, आंदोलन तीव्र करण्याचा दिला इशारा
By नामदेव मोरे | Published: October 21, 2022 06:55 PM2022-10-21T18:55:32+5:302022-10-21T18:56:21+5:30
Navi Mumba: उद्यान विभागातील वाशी, ऐरोली व सानपाडा मधील कंत्राटी कामगारांना बोनस व रजा रोखी करणाचे पैसे देण्यात आले नाहीत. यामुळे कामगारांनी उद्यान विभागाच्या उपायुक्तांच्या दालनात ठिय्या आंदाेलन केले.
- नामदेव मोरे
नवी मुंबई : उद्यान विभागातील वाशी, ऐरोली व सानपाडा मधील कंत्राटी कामगारांना बोनस व रजा रोखी करणाचे पैसे देण्यात आले नाहीत. यामुळे कामगारांनी उद्यान विभागाच्या उपायुक्तांच्या दालनात ठिय्या आंदाेलन केले. तत्काळ मागण्या मान्य न केल्यास आयुक्तांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
उद्यान विभागातील २०० पेक्षा जास्त कामगारांना रजारोखीकरण व बोनसचे ३०२०० रुपये दिवाळीपुर्वी मिळणे आवश्यक आहे. परंतु ठेकेदाराने कामगारांच्या हक्काचे पैसे दिलेले नाहीत.वारंवार मागणी करून व विनंती करूनही प्रश्न सुटत नसल्यामुळे कामगारांनी शुक्रवारी सायंकाळी चार वाजता उद्यान उपायुक्त नितीन नार्वेकर यांच्या दालनात आंदोलन केले. बोनसचा प्रश्न मार्ग लागेपर्यंत कार्यालयात बसून राहण्याचा इशारा दिला आहे.
महानगरपालिकेने कायम कामगार व ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान दिले आहे. परंतु कंत्राटी कामगारांना त्यांच्या हक्कापासून वंचीत ठेवले असल्याबद्दल कामगारांनी निषेध केला आहे.
कंत्राटी कामगारांना बोनस व रजा रोखीकरणाचे पैसे न दिल्यास आयुक्तांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा इशारा समाज समता कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. या आंदोलनाच्या वेळी संघटनेचे अध्यक्ष गजानन भोईर, सरचिटणीस मंगेश लाड, भोलेश्वर भोईर, महेंद्र पाटील, संतोष पाटील उपस्थित होते.