सिडकोकडून पावसाळ्यानंतर जलमार्ग सेवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 06:58 IST2019-07-13T23:12:54+5:302019-07-14T06:58:56+5:30

आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २०२० मध्ये विमानाचे पहिले टेकऑफ होईल, या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे.

After the monsoon, the waterway service! | सिडकोकडून पावसाळ्यानंतर जलमार्ग सेवा!

सिडकोकडून पावसाळ्यानंतर जलमार्ग सेवा!

- कमलाकर कांबळे 
नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २०२० मध्ये विमानाचे पहिले टेकऑफ होईल, या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे. त्यामुळे दळणवळणाच्या साधनांवर भर दिला जात आहे. रस्ते वाहतुकीबरोबरच विमानतळापर्यंत प्रवाशांना कमीत कमी वेळात पोहोचता यावे, यासाठी सिडकोने जलमार्गाच्या पर्यायावर भर दिला आहे. त्यानुसार नवी मुंबई ते मुंबई दरम्यानच्या सागरी मार्गाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सिडकोने हाती घेतला आहे. सध्या हा प्रकल्प अंतिम टप्प्यात असून, पावसाळ्यानंतरबहुप्रतीक्षित जलमार्ग प्रवाशांसाठी खुला करण्याची सिडकोची योजना आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिल्या टप्प्यात वर्षाला २० दशलक्ष प्रवासी प्रवास करतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यात ही संख्या वर्षाला ६० दशलक्ष इतकी गृहित धरण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी जलद दळणवळणाची साधने आवश्यक असणार आहेत, त्यानुसार सिडको व राज्य शासन दळणवळणाच्या विविध पर्यायांवर विचार करत आहे. त्यामध्ये न्हावा-शेवा सी लिंक, कोस्टल रोड, सीएसएमटी-पनवेल रेल्वे उन्नत मार्ग आदीचा समावेश आहे. त्याचबरोबर मुंबईतून प्रवाशांना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत जलदगतीने पोहोचता यावे, या दृष्टीने जलमार्गाचा पर्याय निवडण्यात आला आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी काही महिन्यांपूर्वी बीपीटीचे अध्यक्ष संजय भाटिया यांच्या सोबत बैठक घेऊन या संदर्भात चर्चा केली होती. बीपीटी, जेएनपीटी आणि मेरीटाइम बोर्ड यांच्या संयुक्त सहकार्याने नवी मुंबई ते मुंबई दरम्यानचा सागरी मार्गाचा पहिला टप्पा सुरू करण्याची सिडकोची योजना आहे. त्यानुसार मेरीटाइम बोर्डाच्या माध्यमातून वाशी, बेलापूर आणि नेरुळ येथे जेट्टी उभारण्याचे काम सुरू आहे. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पहिल्या टप्प्यासाठी दोन प्रवासी बोट व एक वॉटर टॅक्सी घेण्याची योजना आहे. त्या संदर्भात शिपिंग कॉर्पोरेशनशी चर्चा सुरू आहे. पावसाळ्यानंतर मुंबई ते नवी मुंबई दरम्यान जलवाहतूक सेवा सुरू करण्याची योजना आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे नवी मुंबई ते मुंबई दरम्यानचा प्रवास जलद आणि सुखकर होणार आहे.
>बेलापूर जेट्टीच्या मार्गात अडथळे
बेलापूर खाडीपुलाच्या उलवे बाजूच्या खाडीकिनारी पूर्व व पश्चिम बाजूची तपासणी करण्यात आली. यामध्ये खाडीपुलाच्या पश्चिम बाजूस खाडीच्या पाण्याची खोली जास्त असल्याने या बाजूची जागा जेट्टी उभारणीसाठी योग्य असल्याचा निष्कर्ष सिडकोच्या संबंधित विभागाने काढला आहे. त्याचबरोबर तरघर रेल्वे स्थानक परिसरातून विमानतळ क्षेत्राला जोडणाऱ्या खाडीचॅनेलचा पर्यायही पडताळून पाहिला जात आहे. या ठिकाणची प्रस्तावित जेट्टी विमानतळ क्षेत्राजवळ असली तरी येथील खाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर खारफुटी आहे. त्यामुळे या ठिकाणी जेट्टी उभारण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनेक परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे तूर्तास तरी बेलापूर खाडीपुलाजवळील जागा ही जेट्टी उभारण्यासाठी योग्य असल्याचे सिडकोचे मत आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
>महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या माध्यमातून नवी मुंबईत वाशी, नेरुळ व बेलापूर येथे जेट्टी उभारण्याचे प्रस्तावित आहे. त्याच बरोबर बेलापूर येथील खाडीकिनारी सिडको व मेरीटाइम बोर्डाच्या सहकार्याने मरीना प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित आहे. या सर्व प्रकल्पांच्या माध्यमातून भविष्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई आदी परिसर जोडणे शक्य होणार आहे.
>नवी मुंबई ते मुंबई दरम्यान जलमार्ग सुरू करण्याच्या दृष्टीने प्राथमिक तयारी पूर्ण झाली आहे. त्यानुसार प्रत्येकी ४० ते ४५ कोटी रुपये किमतीच्या दोन अत्याधुनिक प्रवासी बोट आणि एक वॉटर टॅक्सी खरेदी करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. पावसाळा संपताच ही सेवा कार्यान्वित करण्याची योजना आहे.
- लोकेश चंद्र,
व्यवस्थापकीय संचालक,
सिडको

Web Title: After the monsoon, the waterway service!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.