निवडणुकांमध्ये पारदर्शकता यावी म्हणून निवडणूक ओळखपत्र आधार कार्डला जोडा - मंदा म्हात्रे
By नारायण जाधव | Updated: July 5, 2023 18:18 IST2023-07-05T18:18:29+5:302023-07-05T18:18:43+5:30
डुप्लीकेट मतदारांना आळा घालण्यासाठी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी निवडणूक ओळखपत्र हे आधार कार्डशी जोडावे म्हणून ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांना पत्राद्वारे कळविले आहे.

निवडणुकांमध्ये पारदर्शकता यावी म्हणून निवडणूक ओळखपत्र आधार कार्डला जोडा - मंदा म्हात्रे
नवी मुंबई – भारतात निवडणुकांचा उत्सव उत्साहाने साजर होत आहे. वर्षातून कोणती ना कोणती निवडणूक होतेच. पण बोगस मतदान ही खरी समस्या आहे. अनेकदा असे समोर आले आहे की, एकच व्यक्ती वेगवेगळ्या पत्यांवर, विविध शहरात, राज्यात एकाहून अधिक मतदार यादीत नोंदणीकृत असतो. विविध ठिकाणी नोंदणीचा फायदा घेत हा मतदार विविध ठिकाणी मतदान करतो. त्यामुळे त्याचा सर्वत्र संचार राहतो आणि तो वेगवेगळ्या भागात मतदान करतो. त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर खूप मोठा परिणाम होतो या बोगस आणि डुप्लीकेट मतदारांना आळा घालण्यासाठी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी निवडणूक ओळखपत्र हे आधार कार्डशी जोडावे म्हणून ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांना पत्राद्वारे कळविले आहे.
यामुळे निवडणूक ओळखपत्र हे अधिक सुरक्षित करण्यासाठी मदत होणार असून दुबार व त्रिबार मतदारांची नोंदणीवरही निर्बंध लागणार आहे. तसेच या वर्षी १८ वर्षे पूर्ण झालेल्या मतदारांचे मतदार कार्ड व पूर्वी असलेल्या मतदारांचे कार्ड हे आधार कार्डशी जोडावे जेणेकरून येणाऱ्या लोकसभेच्या किंवा सार्वत्रिक निवडणुका ह्यात पारदर्शकता निर्माण होऊन दुबार व त्रिबार असलेल्या मतदार नावांच्या यादया रद्दबादल होण्यास मदत होईल व नावामधील साम्य असलेलेही बोगस मतदार ही कमी होतील, असे त्यांनी म्हटले आहे