पनवेलमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 23:29 IST2019-07-11T23:29:32+5:302019-07-11T23:29:37+5:30
खासगी शाळेची भिंत पाडली : महापालिकेने हॉटेल्सचे बांधकामही हटविले

पनवेलमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई
पनवेल : शहरातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने गुरुवारी कारवाई केली. यामध्ये एका धोकादायक इमारतीचाही समावेश आहे.
शहरातील शनिमंदिर तसेच कर्नाळा स्पोर्ट्स येथील हॉटेलवरही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रभाग ‘ड’चे अधिकारी श्रीराम हजारे यांनी दिली.
कच्छी मोहल्ला येथील खासगी शाळेची अनधिकृत भिंत या वेळी तोडण्यात आली. तर शहरातील शनिमंदिर परिसरातील धोकादायक दोन मजली इमारत पालिकेने जमीनदोस्त केली. पनवेल शहरात धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आहे. प्रभाग ‘ड’मध्ये एकूण १०३ इमारती धोकादायक आहेत. यापैकी ६० इमारती एकट्या पनवेल शहरात आहेत. पनवेल शहरातील काही इमारती शेकडो वर्षे जुन्या आहेत. अतिवृष्टीमुळे इमारती खचण्याचा धोका असल्याने पालिकेने संबंधित इमारतीच्या मालकांना नोटिसा दिलेल्या आहेत. मात्र, अद्यापही शहरात २० धोकादायक इमारतीमध्ये नागरिकांचे वास्तव्य आहे.
अनधिकृत व धोकादायक बांधाकामांवर पालिकेची कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती श्रीराम हजारे यांनी दिली. आजच्या कारवाईवेळी पालिकेचे चारही प्रभाग अधिकारी कर्मचारी, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तसेच दोन जेसीबी, चार डम्पर आदी फौजफाटा कारवाई ठिकाणी होता.