अनधिकृत बॅनरवर कारवाई
By Admin | Updated: April 21, 2016 02:33 IST2016-04-21T02:33:32+5:302016-04-21T02:33:32+5:30
नेरळमधील साई मंदिर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरची दोन दिवसांपूर्वी तोडफोड करून जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात

अनधिकृत बॅनरवर कारवाई
नेरळ : नेरळमधील साई मंदिर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरची दोन दिवसांपूर्वी तोडफोड करून जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे पुन्हा असा प्रकार घडू नये म्हणून कोल्हारे ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या अनेक अनधिकृत फलकावर कारवाई करून ते फलक कायमचेच काढून टाकले आहेत.
नेरळमध्ये १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी बाबासाहेबांना अभिवादन करणारे अनेक फलक लावण्यात आले होते. १५ एप्रिल रोजी कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीमधील बोपेले गावातील बौद्ध समाजाचे तरु ण रवींद्र जाधव यांना साई मंदिर नाक्यावर लावलेले बॅनरची मोडतोड कोणी करीत असल्याचे दिसून आले. त्यावर जाधव यांनी जवळ जावून पाहिले असता तत्काळ बॅनरची मोडतोड करीत असलेल्या कोल्हारे गावातील व्यक्तीला हटकले. तेव्हा जाधव यांना जातिवाचक शिवीगाळ करण्यात आली होती. त्यानुसार त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोमवारी सकाळी कोल्हारे ग्रामपंचायतीने पोलीस बंदोबस्त मागवून साई मंदिर भागात असलेले अनेक छोटे -मोठे सर्वच अनधिकृत फलक काढण्यात आले. असे अनेक फलक हटविल्याने साई मंदिर परिसर मोकळा झाल्याचे दिसते. तसेच नेरळ बसस्थानकातही मोठ -मोठे पोल उभारून भलामोठा फलक उभारण्यात आला होता. तो फलकही काढण्यात आला असून पोल काढण्याचे काम बाकी आहे, तेही लवकरात लवकर काढण्यात येणार असल्याचे कोल्हारे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले आहे. (वार्ताहर)