सात गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई
By Admin | Updated: July 5, 2017 06:45 IST2017-07-05T06:45:52+5:302017-07-05T06:45:52+5:30
चार पोलीस ठाणेअंतर्गत सात गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. फसवणूक, अवैध सावकारी, मारामारी तसेच खंडणी

सात गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : चार पोलीस ठाणेअंतर्गत सात गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. फसवणूक, अवैध सावकारी, मारामारी तसेच खंडणी अशा गुन्ह्यांची त्यांच्यावर नोंद आहे. या कारवाईअंतर्गत सातही जणांना दोन वर्षांकरिता शहरातून हद्दपार करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.
गंभीर स्वरूपाचे गुन्हे नियंत्रित करण्याच्या अनुषंगाने नवी मुंबई पोलिसांनी पाऊल उचलले आहे. यानुसार परिमंडळ-१मधील सात जणांवर हद्दपारीचे आदेश काढण्यात आले आहे. अवैध शस्त्र बाळगणे, दुखापत, घरफोडी, फसवणूक, अवैध सावकारी, मारामारी अशा प्रकारचे गुन्हे असलेल्यांच्या हालचालींवर परिमंडळ १ चे उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांच्या सूचनेनुसार गुप्त पाळत ठेवण्यात आली होती. यादरम्यान विविध पोलीस ठाण्याअंतर्गत सात गुन्हेगारांच्या गुन्हेगारी हालचाली सुरू असल्याचे आढळून आले. यासंदर्भाचा अहवाल तयार करून तो पोलीस आयुक्तांकडे सादर करून त्यांना तडीपार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या प्रस्तावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर
किशोर गायकवाड याच्यावर फसवणूक व अवैध सावकारीचे १३ गुन्हे दाखल आहेत, तर सुरेश पाटील याच्यावर घरफोडीचे सात तर दुखापतीचा एक गुन्हा आहे. सुरेश पारकर याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, तसेच मारामारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याशिवाय आनंद म्हेत्रे, नवनाथ अडांगळे, रूपेश जोशी व फिरोज शेख या तिघांवरही तितकेच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याविरोधात रबाळे एमआयडीसी, कोपरखैरणे, नेरुळ व रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
भविष्यात त्यांच्याकडून गुन्हेगारी कारवाया वाढू नयेत, याकरिता त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आल्याचे सहआयुक्त प्रशांत बुरडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याप्रसंगी उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे, सहायक आयुक्त प्रदीप जाधव यांच्यासह सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक उपस्थित होते.
प्रस्तावावर शिक्कामोर्तब
सातही सराईत गुन्हेगारांना हद्दपारीचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामध्ये आनंद अंगद म्हेत्रे (रबाळे एमआयडीसी), सुरेश यशवंत पाटील (दिघा), किशोर गवऱ्या गायकवाड (खैरणे गाव), सुरेश पांडुरंग पारकर (कोपरखैरणे), नवनाथ एकनाथ अडांगळे (कोपरखैरणे), रूपेश चंद्रकांत जोशी (शिरवणे) व फिरोज नजिर अहमद शेख (तळवली गाव) अशी हद्दपार झालेल्यांची नावे आहेत.