गुन्हे शाखेची कारवाई : नायझेरियनकडून १० लाखाचा अमली पदार्थ जप्त
By सूर्यकांत वाघमारे | Updated: August 26, 2023 20:26 IST2023-08-26T20:26:12+5:302023-08-26T20:26:26+5:30
कोपर खैरणेत करायचा ड्रग्स विक्री

गुन्हे शाखेची कारवाई : नायझेरियनकडून १० लाखाचा अमली पदार्थ जप्त
नवी मुंबई : गुन्हे शाखा पोलिसांनी कोपर खैरणेतून नायझेरियन व्यक्तीला अटक करून त्याच्याकडून १० लाख रुपये किमतीचा एमडी हा अमली पदार्थ जप्त केला आहे. बोनकोडे येथील शिवाजी नगर परिसरात हि नायझेरियन व्यक्ती रहायला होती. त्याच परिसरात तो अमली पदार्थ विक्रीचे काम करत होता.
कोपर खैरणेतील बोनकोडे परिसरात अमली पदार्थ विक्री होत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार अपर आयुक्त दीपक साकोरे, सहायक आयुक्त गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक निरीज चौधरी यांनी सहायक निरीक्षक मंदाकिनी चोपडे, उपनिरीक्षक विजय शिंगे, रमेश तायडे आदींचे पथक केले होते.
या पथकाने शुक्रवारी बोनकोडे येथील शिवाजी नगर परिसरात सापळा रचला होता. त्यामध्ये एक नायझेरियन व्यक्ती संशयास्पद वावरताना आढळून आला. यामुळे त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे १०० ग्रॅम एमडी हा अमली पदार्थ आढळून आला. त्याची किंमत १० लाख रुपये असून त्याने तो विक्रीसाठी स्वतकडे ठेवला होता. नाचोर पॉल (३१) असे अटक केलेल्या नायझेरियन व्यक्तीचे नाव असून तो त्याच परिसरात रहायला होता. कोपर खैरणे परिसरात ठिकठिकाणी अमली पदार्थ विकले जात असल्याने तरुणाई नशेच्या आहारी गेली आहे. त्यातूनच गुन्हेगारी कृत्ये देखील घडत आहेत. दरम्यान त्याने हे ड्रग्स कोणाकडून घेतले होते याचा अधिक तपास गुन्हे शाखा पोलिस करत आहेत.