नवी मुंबई : बडोदा बँक लुटीमध्ये पकडण्यात आलेल्या आरोपीने कोठडीत स्वत:ला जखमी करून घेतले आहे. त्यामुळे या प्रकरणी पकडण्यात आलेल्या आरोपींना सांभाळायचे मोठे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे, तसेच गुन्ह्यात गुन्हेगारांच्या कौटुंबिक टोळ्या सहभागी असल्याचे समोर आले आहे.बडोदा बँक लुटीतील आरोपी हाजीद अली मिर्जा बेग याने वैद्यकीय चाचणीदरम्यान वाशी रुग्णालयात स्वत:ला जखमी करून घेतले. पोलिसांच्या हातून निसटून त्याने रुग्णालयातील कपाटावर डोके आपटून घेतले. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारामुळे कोठडीतील गुन्हेगारांना सांभाळायचे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे, तसेच चोरी गेलेला ऐवजाच्या जप्तीसाठी पोलिसांची कसोटी लागली आहे.या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या दहा दिवसांत दहाहून अधिक जणांना अटक केली आहे. त्यामध्ये काही दाम्पत्यांचादेखील समावेश आहे. त्यांच्यावर अनेक राज्यामध्ये घरफोडीचे गुन्हे दाखल असून, हरयाणा येथील बँक लुटीच्या घटनेपासून त्यांनी प्रेरणा घेतल्याचे समोर आले आहे. यापूर्वी अनेक गुन्हे केलेले असल्यामुळे पकडले जाऊ नये, याकरिता बँक लुटताना काय खबरदारी घ्यायची, याची शक्कल महिलांनी लावल्याचेही पोलिसांनी सांगितले.
कोठडीतील आरोपीने केले स्वत:ला जखमी, नवी मुंबई बँक दरोड्यातील आरोपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 05:34 IST