कॅन्सरग्रस्त मुलांच्या राहण्याची इथे होणार सोय; खारघरमध्ये उभारणार १२ मजली इमारत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2023 09:24 IST2023-05-27T09:24:40+5:302023-05-27T09:24:47+5:30
गेल्या काही वर्षांत लहान मुलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. अनेक जण उपचारांसाठी टाटा रुग्णालयाची वाट धरतात.

कॅन्सरग्रस्त मुलांच्या राहण्याची इथे होणार सोय; खारघरमध्ये उभारणार १२ मजली इमारत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : टाटा रुग्णालयातील कॅन्सरग्रस्त आणि त्यांच्या नातेवाइकांची राहण्याची सोय हा गेल्या अनेक वर्षांपासूनचा कळीचा मुद्दा आहे. रुग्णालय परिसरात उपलब्ध धर्मशाळांमध्येही रुग्णाच्या नातेवाइकांना राहण्यासाठी जागा नसते. त्यामुळे अनेकदा त्यांना फुटपाथवर वा पुलाखाली पथारी मांडावी लागते. मात्र, आता खारघर येथे कॅन्सरग्रस्त मुले आणि त्यांच्या नातेवाइकांच्या निवासाची व्यवस्था केली जाणार असून याकरिता १२ मजली इमारत उभारण्यात येणार आहे. त्यामुळे एकाच वेळी २२६ कुटुंबे या इमारतीत राहू शकणार आहेत.
गेल्या काही वर्षांत लहान मुलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. अनेक जण उपचारांसाठी टाटा रुग्णालयाची वाट धरतात. उपचारांसाठी अनेक महिने लागतात. अशावेळी गरीब रुग्णांना राहण्यासाठी धर्मशाळेशिवाय पर्याय नसतो. मात्र, रुग्णसंख्या मोठी असल्याने या धर्मशाळाही अपुऱ्या पडतात. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन टाटा रुग्णालयाच्या खारघर येथील ॲडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर (ॲक्ट्रेक) हा दुसरा मोठा परिसर असून या ठिकाणीही रुग्णांना उपचार दिले जातात. याच ठिकाणी कॅन्सरग्रस्त मुले व त्यांच्या नातेवाइकांसाठी १२ मजल्यांची इमारत उभारली जात आहे. या इमारतीच्या देखभाल व उभारणीसाठी लागणारा खर्च सेंट ज्यूड्स इंडिया चाइल्ड केअर सेंटर या संस्थेतर्फे केला जाणार आहे. ॲक्ट्रेकचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी सांगितले की, टाटा मेमोरियल सेंटर आणि सेंट ज्यूड्स चाइल्ड केअर सेंटरतर्फे कॅन्सरग्रस्त मुलांची उच्च दर्जाची काळजी घेतली जाईल.
खारघर येथील जागा लहान मुलांच्या दृष्टीने खूप चांगली असून, या ठिकाणी निसर्गरम्य वातावरण आहे. या ठिकाणी त्याच्या राहण्याबरोबर कॅन्सरग्रस्त मुलांना खारघर येथून टाटा रुग्णालयात ने-आण करण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यांचे शिक्षण, समुपदेशन, जेवणाची सोय या ठिकाणी करण्यात येणार आहे. लवकरात लवकर ही इमारत आम्ही उभी करण्याच्या प्रयत्नात आहोत.
- निहाल कवीरत्ने, सहसंस्थापक, सेंट ज्यूड्स इंडिया चाइल्ड केअर सेंटर