नवी मुंबईतील वंडर्स पार्कमधील पाळण्यास अपघात; पाच नागरिक जखमी
By नामदेव मोरे | Updated: June 4, 2023 05:10 IST2023-06-04T05:09:46+5:302023-06-04T05:10:47+5:30
तीन दिवसांपुर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले होते उद्घाटन

नवी मुंबईतील वंडर्स पार्कमधील पाळण्यास अपघात; पाच नागरिक जखमी
नामदेव मोरे, नवी मुंबई: नेरूळमधील महानगर पालिकेच्या वंडर्स पार्कमधील स्काय राइड ( पाळणा) ला शनिवारी रात्री नऊ वाजता अपघात झाला. या अपघातात पाच नागरिक जखमी झाले आहेत. 30 मे ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वंडर्स पार्क चे उद्घाटन झाले होते.
नवी मुंबईतील सर्वात भव्य उद्यान म्हणून वंडर्स पार्क ची ओळख आहे. कोरोनापासून उद्यान नागरिकांसाठी बंद ठेवले होते. दरम्यान उद्यानाच्या नूतनीकरणाचे काम सुरू केले होते. उद्यानात नवीन राईड बसविण्यात आल्या आहेत. 30 मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले. शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास वंडर्स पार्क मधील स्काय राइड मध्ये दुर्घटना घडली. राईड चालू असताना कंत्राटदाराचे प्रोग्रामर प्रोग्रामिंग करत होते त्यावेळी राईड चालू असताना ती खाली येताना थांबली नाही . आणि खालील लोखंडी संरक्षक कठड्याला सर्व पाळणे घासत घासत गेले आणि त्यामध्ये पाच नागरिकांना दुखापत झालेली आहे. एकाची परिस्थिती गंभीर आहे सर्वांना आपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल केलेले आहेत. घटनास्थळी मनपाचे अधिकारी, पोलीस अधिकारी दाखल झाले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उद्घाटनानंतर तीन दिवसात अपघात झालाच कसा असा प्रश्न उपस्थित केला आहे.राइडस सुरक्षित नव्हत्या सुरक्षिततेची कुठली तपासणी केली नव्हती तर घाई घाईने या वंडर्स पार्कचे उद्घाटन का करण्यात आले असा प्रश्न मनसेचे पदाधिकारी सविनय म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.