लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पाऊस असल्याने खासगी कंपनीतील सुरक्षारक्षकाने आपले बूट काढून ठेवले होते, काही वेळानंतर तो बूट घालायला गेला खरा, पण... बुटात लपलेला साप पाहून तो पुरता हादरला. त्यानंतर सर्पमित्राला बोलावण्यात आले. त्याने सापाला बाहेर काढल्यानंतर तो कोब्रा जातीचा चष्माधारी तीन फुटी नाग होता. त्याला पाहून कंपनीतील सर्व जण आवाक झाले. वेळीच लक्षात आल्याने अनर्थ टळला.
टीसीसी औद्योगिक वसाहतीतील महापे येथे एका खासगी कंपनीतील सुरक्षारक्षकाने पाऊस असल्याने बूट बाहेर काढून ठेवले होते. काही वेळानंतर तो बूट पुन्हा घालण्यासाठी केला असता त्याला बुटात काही तरी हालचाल जाणवली. बुटाच्या आत पाहिले असता साप असल्याचे लक्षात आले. त्यानंतर सर्पमित्र अक्षय डांगे यांना बोलावण्यात आले. त्यांनी शिताफीने बुटात लपलेल्या नागाला बाहेर काढले आणि नंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.
‘बुट घालताना काळजी घ्या’बाहेर पाऊस असल्याने सापासारखे सरपटणारे प्राणी सुरक्षेसाठी उष्ण आणि कोरडी जागा शोधत असतात. याच कारणास्तव या चष्माधारी कोब्राने बुटांमध्ये आसरा घेतलेला असावा, असे डांगे यांनी सांगितले आहे.