तरुणाच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; मोबाईलमुळे समोर आले कारण
By सूर्यकांत वाघमारे | Updated: April 10, 2023 15:10 IST2023-04-10T15:09:46+5:302023-04-10T15:10:16+5:30
घणसोलीत राहणाऱ्या विवाहितेने केली होती आत्महत्या

तरुणाच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; मोबाईलमुळे समोर आले कारण
नवी मुंबई : माहेरी शेजारी राहणाऱ्या तरुणाच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. फेब्रुवारी घणसोलीत हि घटना घडली होती. या विवाहितेच्या मोबाईलमध्ये तिला झालेला अश्लील शिवीगाळ समोर आला आहे. याप्रकरणी तरुणावर रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घणसोली येथील कौलआळीत राहणाऱ्या पूजा काकडे (ईक्कर) हा विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना २२ फेब्रुवारीला घडली होती. दरम्यान तिच्या आत्महत्येचे नेमके कारण समोर आले नव्हते. यापूर्वी तिच्या चारित्र्याच्या संशयावरून पती पत्नीत वाद सुरु होते. मात्र कुटुंबातील व्यक्तींनी मध्यस्थी केल्यानंतर त्यांचा संसार पुन्हा रुळावर आला होता. त्यातच फेब्रुवारी महिन्यात तिने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करण्यासाठी तिचा मोबाईल तपासला असता त्यामध्ये काही अनोळखी नंबरवरून आलेले फोन व मॅसेज समोर आले. त्यामुळे पोलिसांनी मृत पूजाच्या वडिलांना संपर्क साधून रविवारी त्याबाबत खात्री केली. त्यामध्ये पूजाच्या माहेरी हिंजवडी येथे राहणाऱ्या अर्जुन पोळ याच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे समोर आले.
याबाबत पूजाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून रविवारी त्याच्यावर रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्जुन काही महिन्यांपासून तिला वेगवेगळ्या नंबरवरून फोन व मॅसेज करून अश्लील शिवीगाळ करत होता. त्याबाबत तिने यापूर्वी वडिलांना सांगितले असता त्यांनी त्याला समज देखील दिली होती. त्यानंतरही तो त्रास देतच राहिल्याने त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून पूजाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.