नवी मुंबई - एकमेकांवर जडलेल्या प्रेमातून मावस भाऊ-बहिणीनेच लग्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. तरुणाच्या आत्महत्येनंतर पोलिसांच्या चौकशीत या प्रकरणाचा संपूर्ण उलगडा झाला. याप्रकरणी तरुणीवर उलवे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उलवे परिसरात राहणाऱ्या २८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जानेवारी महिन्यात घडली होती. मात्र, त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नव्हते. पोलिसांचा तपास सुरू असताना तरुणाने त्याच्याच मावस बहिणीसोबत रजिस्टर लग्न केल्याचे उघडकीस आले. या घटनेची त्यांच्या कुटुंबीयांना माहिती नव्हती. काही दिवसांनंतर तरुणीला समाजात आपली बदनामी होण्याची भीती वाटू लागली. त्यामुळे दोघांमध्ये वाद सुरू झाले. यादरम्यान तरुणीने दुसऱ्या मुलासोबत रजिस्टर लग्न केल्याचे तरुणाला समजले. त्यामुळे मानसिक तणावात असलेल्या त्या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येनंतर पोलिसांकडून मित्रपरिवाराकडे चौकशी सुरू असताना हा प्रकार उघडकीस आला.