नवी मुंबईत खासगी तरणतलावांचे पेव; पण प्रशासनाचा ना सुरक्षेवर अंकुश, ना शुल्कावर..!!
By सूर्यकांत वाघमारे | Updated: April 6, 2026 11:55 IST2026-04-06T11:54:35+5:302026-04-06T11:55:16+5:30
प्रशिक्षकांचा पोरखेळ, सुरक्षेच्या नियमांना बगल

नवी मुंबईत खासगी तरणतलावांचे पेव; पण प्रशासनाचा ना सुरक्षेवर अंकुश, ना शुल्कावर..!!
सूर्यकांत वाघमारे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: शहरातील पंधराहून अधिक खासगी तरणतलाव असून, त्या ठिकाणी शेकडाे लहान मुलांसह प्रौढ व्यक्ती पोहण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. मात्र बहुतांश तरणतलावांत प्रावीण्यप्राप्त प्रशिक्षक नाहीत. त्यावर प्रशासनाचे कसलेच नियंत्रण नसल्याने केवळ नफ्यासाठी हे तरणतलाव सुरू आहेत.
नवी मुंबईतून दोन दशकात अनेक जलतरणपटू घडले. महापालिकेने जलतरणपटू घडविण्याच्या उद्देशाने वाशीत ऑलिम्पिक दर्जाचे तर घणसोलीत साधारण असे दोन तरणतलाव उभारले. त्याशिवाय महापालिका क्षेत्रात जवळपास १५ खासगी क्लब, संस्थांमार्फत तरणतलाव चालवले जात आहेत. त्यांच्यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागाच्या परवानगी घेणे याशिवाय ना कोणते प्रशासकीय निर्बंध आहेत, ना कोणती नियमावली.तरणतलावात प्रशिक्षणार्थींना विम्याचे ‘सुरक्षा कवच’ पुरवले जात नाही. त्यामुळे पोहताना दुर्घटना घडून जखमी झाल्यास किंवा जीवावर बेतल्यास कोणालाही भरपाई मिळत नाही.
महापालिकेचा जुहूगाव येथे ऑलिम्पिक दर्जाचा ५० मीटर लांबीचा तरणतलाव आहे. गतवर्षापासून तो ठेकेदारामार्फत वापरात आहे. येथे एक हजार रुपये शुल्क आहे. घणसोलीतल्या सेंट्रल पार्कमधील तरणतलाव महापालिका चालवते. येथे वयोगटानुसार ३०० ते ६०० रुपये शुल्क आहे. वाशी, नेरूळ, सीबीडी, ऐरोली येथे खासगी क्लबचे तरणतलाव आहेत. येथे २० दिवसांचे तीन हजार रुपये शुल्क आहे.
अशा घडल्या दुर्घटना
जुहूगाव येथे महापालिकेच्या तरणतलावात गतवर्षी एका तरुणीचा मृत्यू झाला. वाशीतील फादर अग्नल शाळेच्या तरणतलावात एका प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. घणसोलीतला तरणतलावात वर्षभरातच अनेक तरुण, मुले जखमी झाली आहेत. सुरक्षा रॉड निखळणे, छताचे प्लास्टर कोसळणे, तळाशी असलेल्या फिल्टचे नट ढिले होऊन ते हाता पायाला लागून प्रशिक्षणार्थी रक्तबंबाळ होत आहेत.
महिला प्रशिक्षकांचा अभाव
महापालिकेच्या तरणतलावासह खासगी तरणतलावात बहुतांश मुली, महिलादेखील शिकण्यासाठी येत असतात. प्रशिक्षण देण्यासाठी महिला प्रशिक्षक नसल्याने त्यांना अवघडलेपणा येतो. तर काही प्रशिक्षक किंवा तरणतलावाचे कर्मचारी महिलांसोबत गैरवर्तन करत असल्याच्या तक्रारीवरून काही प्रकरणे पोलिस ठाण्यापर्यंतही गेली आहेत.