जीएसटीच्या पहिल्या आठवड्यात मनपाची ७७.९२ कोटी करवसुली
By Admin | Updated: July 8, 2017 06:01 IST2017-07-08T06:01:32+5:302017-07-08T06:01:32+5:30
‘एक देश, एक कर’ ही संकल्पना संपूर्ण देशभरात वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीच्या माध्यमातून लागू झाली आहे. जीएसटीच्या

जीएसटीच्या पहिल्या आठवड्यात मनपाची ७७.९२ कोटी करवसुली
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : ‘एक देश, एक कर’ ही संकल्पना संपूर्ण देशभरात वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीच्या माध्यमातून लागू झाली आहे. जीएसटीच्या अनुदानाच्या पहिल्या हप्त्यात नवी मुंबई महानगरपालिकेने ७७.९२ कोटी करवसुली केली असून, राज्यात चौथ्या क्रमांकाची रक्कम मिळाली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकरिता विशेष प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणातंर्गत कर प्रणाली पूर्णत: समजून घ्यावी व देयके बनविताना आणि तपासताना ती अचूक असावीत, याची दक्षता घेण्याच्या सूचना करण्यात आल्या.
महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी आपल्या महानगरपालिकेच्या करवसुली विभागाने मागील तीन वर्षे अतिशय चांगले काम केल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. करवसुलीचा हाच वेग कायम ठेवत या वर्षातही चालू वसुली, तसेच मागील थकबाकीची वसुली अधिक कशी होईल, यावर भर देण्याच्या सूचना या वेळी करण्यात आल्या.
दोन सत्रांत आयोजित केलेल्या या विशेष प्रशिक्षण वर्गातील जीएसटी कर प्रणालीबाबतच्या माहितीचा उपयोग सर्व अधिकारी-कर्मचारी यांना यापुढील काळात लेखाविषयक कामकाजात होईल, असा विश्वास व्यक्त करीत मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड यांनी प्रास्ताविकपर मनोगतात जीएसटी करप्रणालीबाबत कोणत्याही प्रकारची शंका मनात राहू नये, यादृष्टीने माहितीच्या सत्रानंतर चर्चासत्रामध्ये शंकानिरसन करण्यात आले. या वेळी अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण व रमेश चव्हाण, प्रशासन विभागाचे उपआयुक्त डॉ. सुहास शिंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड, उपआयुक्त किरणराज यादव, प्रशिक्षणाचे मार्गदर्शक वक्ते जिग्नेश चावला व ऋ तुराज इंगळे आणि इतर विभागप्रमुख व्यासपीठावर उपस्थित होते.