प्रतिसादाअभावी ६ हजार घरे शिल्लक; सिडकोची आर्थिक कोंडी, नियमांत शिथिलता आणणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 06:50 IST2025-02-10T06:49:46+5:302025-02-10T06:50:09+5:30

घरांचे विक्री धोरण शिथिल करण्यासाठी सिडकोकडून चाचपणी सुरू

6 thousand houses left due to lack of response; CIDCO's financial crisis, will it bring relaxation in rules? | प्रतिसादाअभावी ६ हजार घरे शिल्लक; सिडकोची आर्थिक कोंडी, नियमांत शिथिलता आणणार?

प्रतिसादाअभावी ६ हजार घरे शिल्लक; सिडकोची आर्थिक कोंडी, नियमांत शिथिलता आणणार?

कमलाकर कांबळे

नवी मुंबई - विविध कारणांमुळे सिडकोच्या घरांना प्रतिसाद मिळताना दिसत नाही.  २०१८ ते २०२२ या चार वर्षांत सिडकोने बांधलेली ६,००० घरे  विक्रीविना पडून आहेत. त्यामुळे हजारो कोटींची सिडकोची गुंतवणूक अडकून पडली आहे. परिणामी शिल्लक राहिलेली जुनी घरे विकण्यासाठी पारंपरिक धोरणात शिथिलता आणण्याच्या दृष्टीने सिडकोने चाचपणी सुरू केली आहे. 

आवास योजनेंतर्गत सिडकोने विविध नोडमधील १९ ठिकाणी ८७ हजार घरे बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी ३० हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. २०१८ ते २०२२ या कालावधीत विविध गृहयोजना जाहीर केल्या. त्यात अनेक यशस्वी अर्जदारांनी घराचा एकही हप्ता भरला नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात घरे शिल्लक आहेत. त्यामुळे शिल्लक घरे विकण्यासाठी नियमांत शिथिलता आणण्याच्या हालचाली सुरू असल्याची विश्वासनीय माहिती आहे.

सिडकोची आर्थिक कोंडी 

शिल्लक घरे विकण्यासाठी कोविड योध्दे, पोलिस कर्मचारी, महापालिका आणि इतर तत्सम शासकीय प्राधिकरणांतील कर्मचाऱ्यांसाठी आठ ते नऊ विशेष योजना जाहीर केल्या.  मात्र, त्यानंतरही या घरांना ग्राहक मिळाला नाही.  शिल्लक घरे विकली जात नसतानाच  घरांच्या नवीन योजना जाहीर केल्या. नवीन योजनेतील घरांनाही फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. एकूणच नवीन घरांना प्रतिसाद  नाही आणि शिल्लक राहिलेली जुनी घरे विकली जात नाहीत. त्यामुळे  सिडकोची आर्थिक कोंडी झाली आहे.  

...अशी आहे योजना

कुटुंबात एकाच्या नावे घर असेल तरी सिडकोचे दुसरे घर घेता येत नाही. परंतु, यात बदल करून दुसरे घर खरेदी करण्याची मुभा दिली जाणार आहे. ही सूट फक्त सिडकोच्या शिल्लक घरांनाच लागू असेल. तसेच या घरांच्या मूळ किमतीत कोणतीही वाढ न करण्याचा प्रस्ताव आहे. त्याशिवाय इतर जाचक अटी आणि शर्ती शिथिल करण्याच्या दृष्टीने विचारविनिमय सुरू असल्याचे समजते. 

तळोजात सर्वाधिक घरे

तळोजा नोडमध्ये सर्वाधिक म्हणजेच जवळपास २५ हजार घरे बांधली जात आहेत. एकूण शिल्लक घरांपैकी सुमारे पाच हजार घरे एकट्या तळोजा नोडमधील आहेत. अनेक उपाययोजना करूनही  येथील घरे विकली जात नसल्याने सिडकोची डोकेदुखी वाढली आहे.

Web Title: 6 thousand houses left due to lack of response; CIDCO's financial crisis, will it bring relaxation in rules?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.