काँक्रीटीकरणासाठी ४८० कोटी
By Admin | Updated: September 3, 2015 23:39 IST2015-09-03T23:39:38+5:302015-09-03T23:39:38+5:30
शहर खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिकेने प्रमुख रस्ते व चौकांचे काँक्रीटीकरण

काँक्रीटीकरणासाठी ४८० कोटी
नामदेव मोरे,नवी मुंबई
शहर खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिकेने प्रमुख रस्ते व चौकांचे काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत ठाणे - बेलापूर रोडसह इतर प्रमुख रस्त्यांच्या काँक्रीटीकरणावर तब्बल ४८० कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे शहरात खड्ड्यांचे प्रमाण कमी असून एमआयडीसीतील रस्तेही वर्षभरात सुस्थितीत होण्याची शक्यता आहे.
मुंबई, ठाण्याप्रमाणे नवी मुंबईतही पावसाळ्यात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडत होते. २००७ मध्ये ठाणे-बेलापूर रोडवर प्रचंड खड्डे पडले होते. तुर्भेवरून ठाण्यापर्यंत १५ किलोमीटर अंतर पार करायला जवळपास दोन तास लागत होते. नवी मुंबईमधून ठाण्यापेक्षा पुण्यापर्यंत वाहने लवकर जात होती. काही वेळेला अर्धा ते एक तास वाहतूक एकाच जागी ठप्प होत होती. वाहतुकीची ही समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला. तब्बल १६४ कोटी रुपये खर्च करून या रोडचे काँक्रीटीकरण २००८ मध्ये पूर्ण करण्यात आले. तेव्हापासून सात वर्षे या रोडवरील वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. यानंतर महापालिकेने शहरातील सर्वाधिक वाहतूक असणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला.
इतर शहरांपेक्षा नवी मुंबईची रचना वेगळी आहे. खाडीकिनारी शहर वसल्याने डांबरीकरण केले तरी काही महिन्यात तो खचण्यास सुरवात होते. खड्ड्यांची समस्या सोडविण्यासाठी मुख्य रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले आहे. एमआयडीसीतही काँक्रीटीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. यंदा प्रमुख रस्ते व चौकात खड्डे नसल्याने शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे.
- मोहन डगावकर,
शहर अभियंता, महापालिका
आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ असणाऱ्या मुंंबई कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात अवजड वाहने मोठ्या प्रमाणात येतात. या परिसरातील रस्त्यांवर नेहमीच खड्डे पडत होते. येथील अन्नपूर्णा चौकामध्ये खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होवू लागली होती. येथील सर्व रोडचे काँक्रीटीकरण करण्यात आल्यामुळे खड्ड्यांचा प्रश्न सुटला आहे. वाशी ते कोपरखैरणे, वाशी ते तुर्भे, अरेंजा सर्कल ते कोपरी, वाशी रेल्वे स्टेशन ते वाशी उड्डाणपूल, ऐरोलीमधील अंतर्गत रोडवर चांगले रस्ते केले असून सद्यस्थितीमध्ये शहरातील कोणत्याही मुख्य रस्त्यावर खड्डे दिसत नाहीत.
1महापालिकेला सर्वाधिक महसूल औद्योगिक वसाहतीमधून मिळतो. परंतु उद्योजक व महापालिकेमध्ये दहा वर्षे सुरू असलेल्या वादामुळे तेथील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली होती. रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक करणे अशक्य होवू लागले होते. वाहनांचे प्रचंड नुकसान होत होते.
2देशाच्या विविध भागातून माल एमआयडीसीमध्ये येतो. येथील रस्त्यांची अवस्था पाहून इतर राज्यातील वाहनचालकही स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त करू लागले होते. नवी मुंबईची प्रतिमा मलीन होवू लागली होती. उद्योजकांनी शासनाकडेही तक्रारी केल्या होत्या. पालिका कर वसूल करते परंतु सुविधा देत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. यामुळे पालिका प्रशासनाने एमआयडीसीमधील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यास सुरवात केली आहे.
3अनेक ठिकाणी कामे सुरू असून पुढील वर्षभरात प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे. शहरात आतापर्यंत तब्बल ४८० कोटी रुपये काँक्रीटीकरणावर खर्च करण्यात आले आहेत.