‘सिडको’ची ४,५०८ घरे विक्रीला! प्रथम येणाऱ्यास मिळेल प्राधान्य, अर्जाच्या नोंदणीला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 10:47 IST2025-11-23T10:47:35+5:302025-11-23T10:47:57+5:30
सोडत पद्धतीऐवजी अर्जदारांच्या पसंतीनुसार सदनिकांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे ही योजना अधिक पारदर्शक आणि सोयिस्कर ठरणार आहे, असा विश्वास सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी व्यक्त केला आहे.

‘सिडको’ची ४,५०८ घरे विक्रीला! प्रथम येणाऱ्यास मिळेल प्राधान्य, अर्जाच्या नोंदणीला सुरुवात
नवी मुंबई - सिडकोने आपल्या गृहनिर्माण इतिहासातील महत्त्वपूर्ण पाऊल उचलत पहिल्यांदाच ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर घरे विकण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात ४५०८ घरांची योजना जाहीर केली असून, शनिवारपासून ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे.
तळोजा, द्रोणागिरी, घणसोली, खारघर आणि कळंबोली येथील सिडको गृहसंकुलांमधील या सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध आहेत.
३,३९३ घरे अल्प उत्पन्न गटासाठी
एकूण ४,५०८ घरांपैकी १,११५ सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी, तर ३,३९३ घरे अल्प उत्पन्न गटासाठी आरक्षित आहेत. विशेष म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अडीच लाख रुपयांचे अनुदान मिळेल. या सर्व सदनिका ‘रेडी टू मूव्ह’ असून, संपूर्ण रकमेचा भरणा केल्यानंतर तत्काळ ताबा देण्यात येणार आहे. सोडत पद्धतीऐवजी अर्जदारांच्या पसंतीनुसार सदनिकांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे ही योजना अधिक पारदर्शक आणि सोयिस्कर ठरणार आहे, असा विश्वास सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी व्यक्त केला आहे. सिडकोच्या संकेतस्थळावर २२ नोव्हेंबरपासून अर्ज नोंदणी सुरू झाली आहे. २१ डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. पात्र अर्जदारांना २८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून पसंतीची सदनिका निवडता येणार आहे.