४१४ पोलीस कर्मचाऱ्यांना पसंतीच्या ठिकाणी बदली
By Admin | Updated: May 25, 2017 00:21 IST2017-05-25T00:21:20+5:302017-05-25T00:21:20+5:30
आपल्या पसंतीच्या ठिकाणी बदली मिळाल्यावर संबंधित पोलीस कर्मचारी अधिक कार्यक्षमतेने कार्यरत होऊ शकतात, या सूत्राचा स्वीकार करून रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक

४१४ पोलीस कर्मचाऱ्यांना पसंतीच्या ठिकाणी बदली
जयंत धुळप ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : आपल्या पसंतीच्या ठिकाणी बदली मिळाल्यावर संबंधित पोलीस कर्मचारी अधिक कार्यक्षमतेने कार्यरत होऊ शकतात, या सूत्राचा स्वीकार करून रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी, रायगड जिल्ह्यातील पोलिसांच्या सन २०१७मधील सर्वसाधारण बदल्यांच्या अनुषंगाने ज्या पोलीस कर्मचाऱ्याचा यांच्या विद्यमान नेमणुकीच्या ठिकाणी कार्यकाळ पूर्ण झाला आहे, अशा पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी बदली करण्याचा निर्णय घेतला आहे.
पारसकर यांच्या या निर्णयाला अनुसरून बदलीपात्र पोलीस कर्मचाऱ्यांच्या मंगळवारी जिल्हा पोलीस मुख्यालयातील जंजिरा सभागृहामध्ये मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर १९ सहा. फौजदार, ४७ पोलीस हवालदार, ८३ पोलीस नाईक, २४६ पोलीस शिपाई आणि १९ चालक, अशा एकूण ४१४ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या पोलीस ठाणे, तसेच शाखेच्या मंजूर संख्येनुसार पसंतीचे ठिकाण व पोलीस ठाणेनिहाय रिक्त जागेचा विचार करून बदल्या केल्या आहेत.
पोलीस कर्मचाऱ्यांना तणावमुक्त कामकाज करता यावे, याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे. या वेळी पोलीस मुख्यालय येथे अप्पर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील, पोलीस उप अधीक्षक (गृह) राजेंद्र दंडाळे, पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी व आस्थापना शाखेतील मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होते.
आपल्या पसंतीच्या ठिकाणी बदली मिळाल्याने पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.