दहा दिवसांमध्ये ४०० कोटींचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 23:04 IST2019-08-28T23:02:59+5:302019-08-28T23:04:26+5:30

दोन सर्वसाधारण सभांचे आयोजन : निवडणुकांमुळे नवी मुंबईत विकासाची घाई

400 crore proposal in ten days | दहा दिवसांमध्ये ४०० कोटींचे प्रस्ताव

दहा दिवसांमध्ये ४०० कोटींचे प्रस्ताव

नामदेव मोरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये विकासकामे मार्गी लावण्याची घाई सुरू झाली आहे. २० आॅगस्टच्या सर्वसाधारण सभेमध्ये २६८ कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून, दुसऱ्या सर्वसाधारण सभेमध्येही जवळपास १३० कोटी रुपये खर्चाचे प्रस्ताव मांडले जाणार असून दहा दिवसांमध्ये तब्बल ४०० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


नवी मुंबई महानगरपालिकेने २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी ४०२० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. ७ मार्चला सर्वसाधारण सभेने याला मंजुरी दिली असून, त्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागली. यामुळे मे अखेरपर्यंत नवीन अर्थसंकल्पातील कोणतीही कामे करता आली नाहीत. यानंतर आता कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागणार असून, आॅक्टोबरअखेरपर्यंत सर्वसाधारण सभा घेता येणार नाही, त्यानंतर २०२० मध्ये महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. संपूर्ण आर्थिक वर्षात निवडणुकांमुळे मोठा कालावधी जाणार असल्यामुळे आॅगस्टमध्ये जास्तीत जास्त विकासकामांना मंजुरी देण्याची प्रशासन व सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची धडपड सुरू आहे. २० आॅगस्टला सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. त्या सभेमध्ये तब्बल २६८ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. तब्बल ६९ प्रस्ताव मंजूर करण्यात आले.

अनेक प्रस्ताव चर्चा न करताच मंजूर करण्यात आले. ३० आॅगस्टला पुन्हा विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे. या सभेमध्येही जवळपास १२२ कोटी रुपये खर्चाचे प्रस्ताव मांडण्यात येणार आहेत. या वर्षभरामध्ये प्रथमच दहा दिवसांमध्ये तब्बल ४०० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली जाणार आहे.


निवडणुका जवळ आल्या की महापालिकेमध्ये विकासकामांचे जास्तीत जास्त प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला जातो. अत्यंत घाई-गडबडीमध्ये प्रस्तावांना मंजुरी दिली जाते. यामुळे प्रस्तावांमधील त्रुटी दूर करता येत नाहीत. यापूर्वी ऐरोलीमधील नाट्यगृहाच्या प्रस्तावालाही अशाचप्रकारे घाई गडबडीमध्ये मंजुरी देण्यात आली होती. कमी आसनक्षमता व इतर गोष्टींमुळे पाच वर्षांमध्ये नाट्यगृहाचे काम पूर्ण झालेले नाही.


पाच वर्षांपूर्वी निवडणुकांच्या अगोदरच मोरबे धरण परिसरामध्ये सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या २०० कोटी रुपयांच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. तो प्रस्तावही मार्गी लागू शकलेला नाही. यामुळे या वेळीही गडबडीत प्रस्ताव मंजूर करून महापालिकेचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात यावी, असे मत व्यक्त केले जात आहे. प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करून मंजुरी दिली जावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

बोनसरी नाल्याला संरक्षण भिंत
च्मुसळधार पावसामुळे एमआयडीसीमधील बोनसरी झोपडपट्टीमध्ये पाणी शिरले होते. नागरिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने तत्कालीन आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी नाल्याला संरक्षण भिंत बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते. येणाºया सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी येणार असून त्यासाठी ५ कोटी ७२ लाख रुपये खर्च होणार आहेत.


कोपरखैरणेमध्ये रात्रनिवारा केंद्र
च्महापालिकेने बेघरांसाठी रात्रनिवारा केंद्र बांधण्याचा निर्णय घेतला आहे. कोपरखैरणे सेक्टर २ मध्ये नवीन केंद्र उभारण्यात येणार असून, त्यासाठी २ कोटी ६ लाख रुपये खर्च होणार असून विशेष सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

नेरुळ पादचारी पुलाची दुरुस्ती
च्नेरुळ सेक्टर ८ व सेक्टर २९ पूर्व व पश्चिम विभागास जोडणारा रेल्वे पादचारी पूल धोकादायक झाला आहे. पूल कोसळून अपघात होण्याची शक्यता असल्याने त्याचा वापर थांबविण्यात आला आहे. या पुलाची दुरुस्ती करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून दुरुस्तीसाठी ३१ लाख ३७ हजार रुपये रेल्वेकडे वर्ग करण्याचा प्रस्तावही सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी येणार आहे.

Web Title: 400 crore proposal in ten days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.