पनवेलमध्ये ३८,२६३ नोकरदार महिला

By Admin | Updated: March 8, 2016 02:13 IST2016-03-08T02:13:14+5:302016-03-08T02:13:14+5:30

श्रीमंत तालुका म्हणून रायगड जिल्ह्यात पनवेलचा नावलौकिक आहे. याठिकाणच्या नोकरदार महिलांची संख्या तब्बल ३८, २६३ आहे. मात्र त्या तुलनेत स्थानिक प्रशासनाकडून मिळणाऱ्या सोयी- सुविधा मात्र नगण्य आ

38,263 female workers in Panvel | पनवेलमध्ये ३८,२६३ नोकरदार महिला

पनवेलमध्ये ३८,२६३ नोकरदार महिला

पद्मजा जांगडे,  नवी मुंबई
श्रीमंत तालुका म्हणून रायगड जिल्ह्यात पनवेलचा नावलौकिक आहे. याठिकाणच्या नोकरदार महिलांची संख्या तब्बल ३८, २६३ आहे. मात्र त्या तुलनेत स्थानिक प्रशासनाकडून मिळणाऱ्या सोयी- सुविधा मात्र नगण्य आहे. महिलांची सुरक्षा, पाळणाघर, आरोग्यासाठी विशेष तरतुदी नसल्याने त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
आज सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. कुणी आवड म्हणून, कुणी करिअर म्हणून तर, कुणी गरजेपोटी नोकरी करीत आहेत. पनवेल पालिका क्षेत्रात नोकरदार महिलांची संख्या १६,५५९ इतकी आहे. मात्र नगरपालिकेकडून महिलांच्या सोयी-सुविधांसाठी व सुरक्षेसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतीच विशेष तरतूद करण्यात आलेली नाही. मध्यंतरी रबाळे पोलीस ठाणे व कळंबोली मुख्यालयात महिला कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी पाळणाघर सुरू करण्यात आले. मात्र सरकारी अथवा खाजगी आस्थापनांनी पोलिसांच्या या उपक्रमाचा कित्ता गिरवण्याकडे दुर्लक्ष केले.
सिडको कार्यक्षेत्रात नोकरी-व्यवसायानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांची संख्या ११,९६७ इतकी आहे. उच्चभ्रूंची लोकवस्ती असलेल्या खारघर शहरातील ७६१२ तर सिडको नोडअंतर्गत विकसित होत असलेल्या तळोजा पाचनंद येथील ३५४ महिला नोकरी करतात.
बहुतांश महिला खासगी क्षेत्रात कार्यरत असल्याने त्यांना जवळपास दहा ते बारा तास घराबाहेर राहावे लागते. शहरात हजारोंच्या संख्येत असलेल्या पाळणाघरांबाबत स्थानिक प्रशासनाकडे अधिकृत माहिती नसते. मध्यंतरी एका चिमुरड्याला पाळणाघरात होत असलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिध्द झाला. प्रशासनने सामाजिक संस्थांच्या मदतीने पाळणाघर सुरू केल्यास, नोकरदार महिलांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: 38,263 female workers in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.