नवी मुंबईतील २५ जलकुंभ धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 02:31 AM2020-01-23T02:31:41+5:302020-01-23T02:31:54+5:30

नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी उच्चस्तरीय आणि भूस्तरीय जलकुंभ बांधण्यात आले आहेत.

25 Water tank in Navi Mumbai are dangerous | नवी मुंबईतील २५ जलकुंभ धोकादायक

नवी मुंबईतील २५ जलकुंभ धोकादायक

Next

- योगेश पिंगळे
नवी मुंबई : नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी उच्चस्तरीय आणि भूस्तरीय जलकुंभ बांधण्यात आले आहेत. सिडको व महानगरपालिकेने आतापर्यंत ११८ जलकुंभ बांधले असून, त्यापैकी ९४ सद्यस्थितीमध्ये वापरामध्ये आहेत. शहरातील २५ जलकुंभ धोकादायक असून, तीन निष्कासित करण्यात आले आहेत.

नवी मुंबई शहर बसविताना शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी सिडकोने शहरातील विविध नोडमध्ये २८ उच्चस्तरीय आणि ४६ भूस्तरीय जलकुंभ बांधले होते. महापालिकेच्या स्थापनेनंतर सर्वच जलकुंभ सिडकोने महापालिकेला हस्तांतरित केले आहेत. महानगरपालिकेने शहरवासीयांना मुबलक पाणीपुरवठा करता यावा, यासाठी मोरबे धरण विकत घेतले. मोरबे धरणाची पाणीसाठा करण्याची क्षमता १९०.८९ दशलक्ष घनमीटर असून, दररोज ३८० ते ३९० एमएलडी पाणीसाठ्याची शहराला गरज आहे. शहरातील नागरिकांना कराव्या लागणाऱ्या पाण्याची साठवणूक या जलकुंभांमध्ये केली जाते. आवश्यकतेनुसार महापालिकेने शहरात सुमारे १९ उच्चस्तरीय आणि २५ भूस्तरीय जलकुंभ बांधले आहेत. यामुळे एकूण जलकुंभांची संख्या ११८ झाली आहे. नव्याने ९ उच्चस्तरीय आणि १० भूस्तरीय जलकुंभ बांधण्याच्या कामाला काही दिवसांपूर्वी महासभेने मंजुरीही दिली असून, दिघा भागात एक उच्चस्तरीय आणि १ भूस्तरीय जलकुंभ बांधण्याचे काम सुरू आहे. सिडकोकडून हस्तांतरित झालेल्या जलकुंभांचे आयुष्य संपले असून, अनेक जलकुंभांना तडे गेले आहेत. जलकुंभांच्या संरक्षक भिंतींची दुरवस्था झाली असून, जलकुंभांच्या आवारात स्वच्छता राखली जात नाही, त्यामुळेही जलकुंभांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धोकादायक जलकुंभ आणि त्यांची सुरक्षा याबाबत नगरसेवकांनी अनेक वेळा महासभा आणि स्थायी समिती सभेत चर्चादेखील केली आहे.

महापालिकेच्या माध्यमातून जलकुंभांचे स्ट्रक्चर आॅडिट करण्याचे आदेशही प्रशासनाला देण्यात आले होते. महापालिकेने १६ उच्चस्तरीय आणि १६ भूस्तरीय जलकुंभांचे स्ट्रक्चर आॅडिटही केले असून, यामध्ये सात उच्चस्तरीय आणि १८ भूस्तरीय जलकुंभ धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले आहे. वापरात नसलेल्या जलकुंभांची संख्या सुमारे १८ असून त्यापैकी तीन उच्चस्तरीय जलकुंभ निष्कासित करण्यात आले आहेत. धोकादायक झालेल्या जलकुंभांकडे दुर्लक्ष केल्यास मोठा अपघात घडण्याची शक्यता असून, पर्यायी सुविधा नसल्याने नागरिकांना पाणीपुरवठा करण्याचाही मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. महापालिका प्रशासन आयआयटीच्या माध्यमातून जलकुंभांचे संरक्षणात्मक लेखापरीक्षण करून घेत असून, आलेल्या अहवालाप्रमाणे दुरुस्ती व इतर कामे केली जात आहेत. धोकादायक ठरविलेल्या जलकुंभांच्या जागेवर नवीन जलकुंभ उभारण्यास सुरुवात केली आहे; काही ठिकाणी निविदा प्रक्रिया वेळेत होत नसल्यामुळे काम रखडले आहे.

३२ जलकुंभांचे लेखापरीक्षण
महापालिकेने आतापर्यंत ३२ जलकुंभांचे संरक्षणात्मक लेखापरीक्षण केले आहे. यामध्ये १६ उच्चस्तरीय व १६ भूस्तरीय जलकुंभांचा समावेश आहे.
आवश्यकतेप्रमाणे जुन्या जलकुंभांचे लेखापरीक्षण आयआयटीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. लेखापरीक्षण अहवालाप्रमाणे दुरुस्ती व पुन्हा नवीन बांधण्याचा निर्णय घेतला जात आहे.

नवीन जलकुंभांचे बांधकामही सुरू
महापालिका क्षेत्रामध्ये दोन जलकुंभांचे बांधकाम सुरू आहे. १९ जलकुंभांना महापालिकेने परवानगी दिली असून, निविदा प्रक्रिया पूर्ण करून त्यांचे काम सुरू केले जाणार आहे. वाशी सेक्टर ५ मधील जलकुंभही धोकादायक घोषित केला असून, निविदा प्रक्रिया सुरू केली आहे; परंतु निविदेस अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. प्रशासनाने लवकरात लवकर निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे.

शहरातील सर्व जलकुंभांची नियमित देखभाल केली जात आहे. आवश्यकतेप्रमाणे जलकुंभांचे संरक्षणात्मक लेखापरीक्षण केले जात असते व येणाºया अहवालाप्रमाणे त्यावर उचित कार्यवाही करण्यात येते. धोकादायक ठरलेल्या जलकुंभांच्या ठिकाणी व मागणीप्रमाणे नवीन जलकुंभही उभारले जात आहेत.
- सुरेंद्र पाटील, शहर अभियंता,
नवी मुंबई महानगरपालिका
वाशी परिसरातील धोकादायक जलकुंभांविषयी सर्वसाधारण सभेमध्ये व स्थायी समितीमध्ये वारंवार आवाज उठविला आहे. प्रशासनाने सर्वच जलकुंभांचे संरक्षणात्मक लेखापरीक्षण करावे व धोकादायक जलकुंभाच्या ठिकाणी तत्काळ नवीन जलकुंभ उभारण्यात यावेत.
- दिव्या गायकवाड, नगरसेविका, प्रभाग प्रभाग ६४

अपघाताची शक्यता
धोकादायक घोषित केलेल्या जलकुंभांपैकी काही जलकुंभांचा अद्याप वापर सुरू आहे. वेळेत नवीन जलकुंभ उभारण्याची कार्यवाही सुरू केली नाही तर अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहरातील १८ जलकुंभांचा वापर बंद असून आतापर्यंत तीन जलकुंभ निष्कासित करण्यात आले आहे.

Web Title: 25 Water tank in Navi Mumbai are dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.