नवनगर प्रकल्पाच्या अधिसूचनेवर २५ हजार हरकती

By कमलाकर कांबळे | Updated: April 3, 2024 20:38 IST2024-04-03T20:38:15+5:302024-04-03T20:38:48+5:30

७ एप्रिलपर्यंत मुदत; हरकतींचा आकडा वाढण्याची शक्यता

25 thousand objections to notification of Navnagar project | नवनगर प्रकल्पाच्या अधिसूचनेवर २५ हजार हरकती

नवनगर प्रकल्पाच्या अधिसूचनेवर २५ हजार हरकती

नवी मुंबई : एमएमआरडीएच्या माध्यमातून अटल सेतू प्रभावित क्षेत्रात प्रस्तावित केलेल्या नवनगर प्रकल्पाला अधिसूचित १२४ गावांतील ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. प्रस्तावित नवनगर प्रकल्पाबाबत शासनाने ७ एप्रिलपर्यंत सूचना आणि हरकती मागविल्या आहेत. त्यानुसार आतापर्यंत जवळपास २५ हजार ग्रामस्थांनी कोकण भवन येथील नगर रचना विभागाच्या सहायक संचालकांकडे हरकती नोंदविल्याचे समजते. सूचना आणि हरकती नोंदविण्याची मुदत ७ एप्रिलपर्यंत आहे. त्यामुळे उर्वरित तीन दिवसांत हरकतींचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

राज्य शासनाने सिडकोच्या खोपटा प्रकल्पातील ३२ आणि नैना क्षेत्राच्या दुसऱ्या टप्प्यातील ८० अशा १२४ गावांचा समावेश करून नवनगर प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ४ मार्चपासून सूचना आणि हरकती मागविल्या आहेत. त्याला या विभागातील ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. याचाच एक भाग म्हणून येथील भूधारकांकडून मोठ्या प्रमाणात सूचना आणि हरकती सादर केल्या जात आहेत. विशेष म्हणजे अधिसूचित १२४ गावांतील ग्रामस्थांनी विविध मुद्यांवर शासनाच्या या प्रस्तावाला सुरुवातीपासूनच विरोध केला आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ठराव पारित करून तो कोकण भवन येथील सहसंचालक नगररचना कार्यालयात सादर करण्यात आला आहे. एकूणच येत्या काळात ग्रामस्थांचा हा विरोध आणखी तीव्र होण्याची शक्यता असून, त्यामुळे एमएमआरडीएची डोकेदुखी वाढणार आहे.

Web Title: 25 thousand objections to notification of Navnagar project