१६ माजी नगरसेवक पराभूत
By Admin | Updated: May 27, 2017 01:48 IST2017-05-27T01:48:36+5:302017-05-27T01:48:36+5:30
पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत ७८ पैकी ५१ जागांवर भाजपाने विजय संपादित केला असून, शेकाप आघाडीला केवळ २७ जागांवर समाधान मानावे लागले आहे

१६ माजी नगरसेवक पराभूत
मयूर तांबडे
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत ७८ पैकी ५१ जागांवर भाजपाने विजय संपादित केला असून, शेकाप आघाडीला केवळ २७ जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निवडणुकीत अनेक आजी-माजी नगरसेवक निवडणूक लढवत होते, त्यांनादेखील पराभवाचा धक्का बसला आहे.
पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत २८ आजी-माजी नगरसेवक निवडणूक लढवत होते. यापैकी काँग्रेसच्या निर्मला म्हात्रे, लतीफ शेख, भाजपाचे नितीन पाटील, संगीता कांडपाळ, शेकापचे राजेश हातमोडे, संदीप पाटील, सुनील बहिरा, श्वेता बहिरा, अजय कांडपिळे, मुकुंद म्हात्रे, शिवाजी थोरवे, शिवसेनेचे रमेश गुडेकर, अच्युत मनोरे, प्रमिला कुरघोडे, राष्ट्रवादीचे अजय भोईर, शशिकला सिंग या माजी नगरसेवकांचा या पनवेल महापलिकेच्या निवडणुकीत पराभव झाला. तर भाजपाचे मनोहर म्हात्रे, हेमलता म्हात्रे, समीर ठाकूर, संतोष शेट्टी, चारुशीला घरत, दर्शना भोईर, राजू सोनी, एकनाथ गायकवाड, सीता पाटील, प्रकाश बिनेदार व शेकापचे प्रीतम म्हात्रे, सुरेखा मोहोकर या माजी नगरसेवकांचा विजय झाला. माजी नगरसेवकांत प्रीतम म्हात्रे व नितीन पाटील, संतोष शेट्टी व शशिकला सिंग, श्वेता बहिरा व चारु शीला घरत, राजेश हातमोडे व समीर ठाकूर यांच्यात एकमेकांविरोधात लढत झाली. यात प्रीतम म्हात्रे, संतोष शेट्टी, चारुशीला घरत, समीर ठाकूर हे विजयी झाले. तर जिल्हा परिषद व पंचायत समितीचे माजी सदस्य चंद्रकला शेळके, हरिष केणी, प्रज्योती म्हात्रे, गोपाळ भगत, अरविंद म्हात्रे यांनीदेखील विजय संपादित केला आहे.
शेकापचे अजीज पटेल यांनी भाजपाच्या विनोद घरत यांच्यावर प्रभाग-३मध्ये केवळ १ मताने विजय प्राप्त केला आहे. तर भाजपाचे परेश ठाकूर यांनी ११ हजारहून अधिक मते घेत, शेकापच्या बाळाराम पाटील यांच्यावर ७ हजार ५०० मतांनी विजय मिळविला. शेकापचे संदीप पाटील हे पाचव्यांदा निवडणूक लढवत होते. चार वेळा ते विजयी झाले होते. मात्र, भाजपाच्या मनोज भुजबळ यांनी त्यांचा पराभव केला.