नवी मुंबई क्षेत्रातील १५६ गुन्हेगार हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 01:09 IST2019-04-26T01:09:12+5:302019-04-26T01:09:35+5:30
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई : भुरट्या चोरांसह गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा समावेश

नवी मुंबई क्षेत्रातील १५६ गुन्हेगार हद्दपार
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालय क्षेत्रातून १५६ गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. त्यामध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न व चोरीसह इतर गुन्ह्यांमधील आरोपींचा समावेश आहे. तर मागील दीड वर्षात नवी मुंबईतून तब्बल १५६ गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान दहशत पसरवली जाऊ नये, याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे. त्यानुसार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ एक मधून २४ तर परिमंडळ दोनमधून १९ जणांना हद्दपार करण्यात आले आहे. परिमंडळ एकचे उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे व परिमंडळ दोनचे उपआयुक्त अशोक दुधे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिनियम कलम ५६ व ५७ अंतर्गत या कारवाया झाल्या आहेत. त्यामध्ये मारामारी, वाहनचोरी, हत्या तसेच हत्येचा प्रयत्न, घरफोडी यासह सोनसाखळी व मनाई आदेशाचे उल्लंघन अशा गुन्ह्यातील गुन्हेगारांचा समावेश आहे. त्यांना मुंबई, मुंबई उपनगर यासह ठाणे व रायगड या महसूल जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. या गुन्हेगारांना पुढील दोन वर्षांसाठी सदर महसूल क्षेत्रात प्रवेशबंदी असणार आहे. यामुळे निवडणूक कालावधीची प्रक्रिया शांततेत पार पडेल असा पोलिसांचा विश्वास आहे.
मतदारांवर दहशत पसरवण्यासाठी अथवा ठरावीक उमेदवाराचा प्रभाव वाढवण्यासाठी गुन्हेगारांचा वापर केला जाण्याची
दाट शक्यता असते, त्यामुळे आचारसंहिता घोषित झाल्यापासून पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवायांवर भर दिला जात आहे.
त्यानुसार अवैधरीत्या शस्त्र बाळगणारे, गावठी दारूविक्रेते त्याशिवाय बेहिशोबी रक्कम सोबत बाळगणारे अशांवरही कारवाया केल्या जात आहेत. तर शहरात राहण्यास असलेल्या व विविध गुन्ह्यात सक्रिय सहभाग असणाऱ्या गुन्हेगारांवर पाळत ठेवून त्यांना हद्दपार करण्यात आले आहे. या कारवाईनंतर शहरात त्यांना येण्यास मज्जाव असतानाही एखाद्या गुन्हेगाराने आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यास अटकाव घातला जात आहे. मागील काही दिवसांत अशा प्रकारच्याही कारवाया करण्यात आल्या आहेत. यामुळे नवी मुंबईकरांनी सुटकेचा श्वास घेतला असून, अद्यापपर्यंत शहरात कोणताही गैरप्रकार घडलेला नाही.
नवी मुंबईकरांना गुन्हेगारांच्या दहशतीमधून मुक्त करण्याच्या उद्देशाने पोलिसांकडून मागील तीन वर्षांपासून हद्दपारीच्या कारवायांमध्ये सातत्य ठेवले जात आहे. त्यानुसार तीन वर्षांत तब्बल १५६ गुन्हेगारांना तडीपार केले आहे. त्यामध्ये परिमंडळ एक मधील ९९ तर परिमंडळ दोन मधील ५७ गुन्हेगारांचा समावेश आहे.