ठाणे, पालघरसह रायगड जिल्ह्यात १४ सेवा दवाखाने, कर्मचारी राज्य विमा महामंडळाचा निर्णय
By नारायण जाधव | Updated: September 19, 2022 17:04 IST2022-09-19T17:03:56+5:302022-09-19T17:04:31+5:30
तिन्ही जिल्ह्यांत जागांचा शोध सुरू.

ठाणे, पालघरसह रायगड जिल्ह्यात १४ सेवा दवाखाने, कर्मचारी राज्य विमा महामंडळाचा निर्णय
नवी मुंबई : कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ईएसआयसी) ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात १४ ठिकाणी सेवा दवाखाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महामंडळाने तिन्ही जिल्ह्यात या सेवा दवाखान्यांसाठी जागांचा शोध सुरू केला आहे. यासाठी २९ सप्टेंबरपर्यंत जागामालकांकडून महामंडळाने प्रस्ताव मागविले आहेत.
महामंडळाच्या जूनमध्ये झालेल्या १८८ व्या बैठकीत देशभरात २३ नवीन १०० खाटांची रुग्णालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. यात महाराष्ट्रातील पालघर, सातारा, पेण, जळगाव, चाकण आणि पनवेल येथे ही सहा रुग्णालये उभारणार असल्याचे सांगितले होते. याच बैठकीत महाराष्ट्र राज्यात ४८ ठिकाणी दवाखानेही सुरू करण्याचेही घोषित केले होते. त्यात १४ दवाखाने ठाणे, पालघर आणि रायगड या तीन जिल्ह्यातील आहेत. या दवाखान्यात विमाधारक कामगारांना आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना निवासस्थानाच्या जवळच्या परिसरात दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न आहे.
या ठिकाणी सुरू करणार सेवा दवाखाने
रबाळे, महापे, तुर्भे, नेरूळ, सरावली, डाेंबिवली, वसई, खारघर, पेण, तळोजा, रोहा, न्हावा-शेवा, उरण आणि खालापूर अशी ती १४ ठिकाणे आहेत. यातील सात दवाखाने नवी मुंबई-उरण परिसरातील आहेत.
प्रत्येकी १६०० चौरस फूट जागेचा शोध
यातील प्रत्येक दवाखान्यासाठी १६०० चौरस फूट जागेचा शोध महामंडळाने सुरू केला आहे. याठिकाणी प्रत्येकी दोन डॉक्टर राहणार आहेत. तळमजल्यावरील जागेवरील प्राधान्य देणार असून जागामालकासोबत किमान तीन वर्षांचा करारनामा करण्यात येणार आहे.
कामगारांना मोठा दिलासा
१ महामुंबई परिसरात राज्य कामगार विमा योजनेची वरळी, कांदिवली, मुलुंड, ठाणे, उल्हासनगर आणि वाशी येथे रुग्णालये आहेत. मात्र, आता ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींच्या परिसरातच हे सेवा दवाखाने सुरू होणार आहेत. यामुळे कामाच्या ठिकाणीच तेथील कामगारांना वैद्यकीय मदत उपलब्ध होणार आहेत. यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत ये-जा करण्याचा त्यांचा वेळ, श्रम आणि पैसा यात बचत होणार आहे.
२ ज्या भागात ईएसआय योजना अंशत: अंमलात आणली आहे किंवा अंमलात आणली जाणार आहे किंवा जेथे ईएसआयसीच्या विद्यमान आरोग्यसुविधा मर्यादित आहेत अशा सर्व भागातील विमाधारक कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना, आयुष्मान भारत पीएमजेएवाय संलग्नीकृत रुग्णालयांद्वारे रोकड विरहित (कॅशलेस )वैद्यकीय सेवांचा लाभ देण्याचा निर्णयही यापूर्वीच झाला आहे.