११ टक्के रुग्ण १८ वर्षांखालील, पण लसीकरण नाही, ५३ टक्के रुग्ण ४० वर्षांपेक्षा कमी वयाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 23:42 IST2021-04-20T23:42:45+5:302021-04-20T23:42:57+5:30

तुटवड्यामुळे वारंवार लसीकरण केंद्रे बंद : सर्व वयोगटांसाठी लस उपलब्ध करण्याची मागणी

11% of patients are under 18 years of age but not vaccinated, 53% of patients are under 40 years of age | ११ टक्के रुग्ण १८ वर्षांखालील, पण लसीकरण नाही, ५३ टक्के रुग्ण ४० वर्षांपेक्षा कमी वयाचे

११ टक्के रुग्ण १८ वर्षांखालील, पण लसीकरण नाही, ५३ टक्के रुग्ण ४० वर्षांपेक्षा कमी वयाचे

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : शहरातील ११ टक्के रुग्ण १८ वर्षांपेक्षा कमी वयाचे असून त्यांना लसीकरणासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. ५३ टक्के रुग्ण ४० वर्षांपेक्षा कमी असूून त्यांना वेळेत लस मिळणार की नाही याविषयी साशंकता आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येत आहे, परंतु तुटवड्यामुळे वारंवार लसीकरण बंद ठेवावे लागत असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.             राज्यातील कोरोनाच्या हॉटस्पॉटमध्ये नवी मुंबईचा समावेश आहे. 


आतापर्यंत ८५ हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. नवीन रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे सर्वांना लस उपलब्ध करून देण्याची मागणी होऊ लागली आहे. सद्यस्थितीमध्ये ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. सोमवारपर्यंत १ लाख ८३ हजार ६०४ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. शहराची लोकसंख्या १४ लाखपेक्षा जास्त असून लसीकरणाची गती हीच राहिली तर सर्वांना लस मिळण्यासाठी जवळपास एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. यामुळे सर्वांना व गतीने लस उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. शहरात कोरोनाची सर्वाधिक लागण तरुणांना होत आहे. परंतु त्यांना अद्याप लस दिली जात नाही. एकूण रुग्णांपैकी १८ वर्षांपेक्षा कमी वय असलेले ११ टक्के रुग्ण आहेत. पण या वयोगटातील नागरिकांना लस मिळविण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. शहरातील तब्बल ५३ टक्के रुग्ण ४० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. या वयोगटातील नागरिकांना १ मेपर्यंत प्रतिीक्षा करावी लागणार आहे.


शहरात ४५ वर्षांवरील ४७ टके रुग्ण असून त्यांच्यासाठी लसीकरण सुरू आहे. परंतु त्या सर्वांनाही वेळेत लस मिळत नाही. पुरेसे डोस उपलब्ध होत नसल्यामुळे वारंवार लसीकरण थांबवावे लागत आहे. शहरात नियमित व सर्व वयोगटातील नागरिकांना लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे. 


४० वर्षांखालील तब्बल ४५,७६३ रुग्ण
शहरात सर्वाधिक रुग्ण ४० वर्षांखालील आहेत. आतापर्यंत या वयोगटातील तब्बल ४५,७६३ जणांना कोराेनाची लागण झाली आहे. या वयोगटातील नागरिक नोकरी, व्यवसायासाठी नेहमी बाहेर असतात. यामुळे त्यांना कोरोनाची लागण होत आहे. शासनाने १८ वर्षांवरील नागरिकांना १ मेपासून लस देण्याचे जाहीर केले आहे. परंतु सद्यस्थितीमध्ये ४५ वर्षांवरील नागरिकांना लस पुरवितानाच दमछाक होत असून १८ वर्षांवरील नागरिकांसाठी पुरेसी लस मिळणार का, याविषयी उत्सुकता लागून राहिली आहे.

लहान मुलांची काळजी अधिक घ्यावी लागणार
n१८ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलांना लस देण्यासाठी मंजुरी मिळण्यास वेळ आहे. यामुळे या वयोगटातील मुलांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. 
nमुलांना काम नसेल तर घराबाहेर जाण्यास मंजुरी देऊ नये. त्यांचा आहार व व्यायामावर लक्ष द्यावे. गर्दीच्या ठिकाणी मुले जाणार नाहीत याचीही काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.

१८ वर्षांखालील 
९,६५४ रुग्ण
नवी मुंबईमध्ये लहान मुलांमध्येही कोरोनाची लागण वाढत आहे. आतापर्यंत १८ वर्षांच्या आतमधील तब्बल ९६५४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या वयोगटातील ८ जणांचा मृत्यू झाला आहे. लहान मुलांमध्ये कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही जास्त असले तरी या वयात गंभीर अजार झाल्यामुळे त्याचा परिणाम भविष्यातही त्यांना सहन करावा लागण्याची शक्यता आहे. यामुळे या लहान मुलांनाही लस लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
 

Web Title: 11% of patients are under 18 years of age but not vaccinated, 53% of patients are under 40 years of age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.