तुमच्या नशेपायी जवान शहीद होतात!
By Admin | Updated: December 15, 2014 04:12 IST2014-12-15T04:12:12+5:302014-12-15T04:12:12+5:30
अमली पदार्थांची नशा एक भयंकर आजार आणि एक सामाजिक समस्या आहे़ कुटुंब, समाज आणि देश या सर्वांना गिळंकृत करणारा हा भस्मासूर आहे़

तुमच्या नशेपायी जवान शहीद होतात!
नवी दिल्ली : अमली पदार्थांची नशा एक भयंकर आजार आणि एक सामाजिक समस्या आहे़ कुटुंब, समाज आणि देश या सर्वांना गिळंकृत करणारा हा भस्मासूर आहे़ या दलदलीपासून मुलांना वाचवायचे असेल तर त्यांना ध्येयवादी बनविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले़ नशेच्या या गर्तेतून बाहेर पडू इच्छिणाऱ्यांच्या मदतीसाठी एक टोल फ्री हेल्पलाइन सुरू केली जाईल, अशी घोषणाही पंतप्रधानांनी केली़ तुमची क्षणाची नशा होते, पण त्याची किंमत सीमेवरील जवान शहीद होऊन चुकवतात, याची कल्पना तरी आहे का, असा सवालही त्यांनी नशेच्या आहारी गेलेल्यांना केला.
रविवारी आकाशवाणीवर ‘मन की बात’ कार्यक्रमात मोदींनी नशाखोरीच्या मुद्द्यावर देशाला संबोधित केले़ ज्या माउलीचा पोटचा गोळा नशेच्या आहारी जातो, तो केवळ स्वत:च नाही, तर संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करतो़ केवळ त्याचे कुटुंबच नाही, तर समाज, देशाचीही हानी होती़ नशा एक भयंकर आजार आहे़ एक सामाजिक समस्या आहे़ या समस्येशी चार हात करायचे असतील तर मानसशास्त्रीय दृष्टीने, सामाजिक अंगाने आणि वैद्यकीय उपचारांनी याविरुद्ध लढावे लागेल, असे ते म्हणाले़
ड्रग्ज, नशा ही ‘थ्री डी’ अर्थात डार्कनेस, डिस्ट्रक्शन आणि डिव्हॅस्टेशन या तीन कुप्रवृत्तींना चालना देते़ हे व्यसन जीवनात अंधकार (डार्कनेस) पेरते़ विध्वंस (डिस्ट्रक्शन) आणि विनाश (डिव्हॅस्टेशन) घडवून आणते़ या अंधकारात सापडलेल्यांना प्रकाशाच्या वाटा दाखवायचे काम कुटुंब, समाज आणि सरकार एकत्र येऊन करू शकते, असे मोदी म्हणाले़ सोशल मीडियावरील सक्रिय लोकांनी यासाठी ‘ड्रग्ज फ्री इंडिया’ मोहीम चालवली़ क्रीडा, कला व सार्वजनिक क्षेत्रातील दिग्गजांनीही जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी या वेळी केले़ (लोकमत न्यूज नेटवर्क)
> मोदींनी युवकांपुढे उभे केले अनेक प्रश्न
नशेच्या आहारी गेलेल्या युवकांपुढे मोदींनी अनेक प्रश्न उभे केले़ दोन-चार तास नशेची झिंग अनुभवण्यासाठी धडपडणाऱ्या युवकांना मी विचारू इच्छितो की, ज्या पैशाने तुम्ही अमली पदार्थ विकत घेता, तो पैसा कुठे जातो?
हे अमली पदार्थांचे पैसे अतिरेक्यांजवळ गेले तर? त्या पैशाने अतिरेकी शस्त्र विकत घेतील व याच शस्त्रांनी रक्षण करणाऱ्या जवानांवर हल्ला चढवतील़
तुमच्या देशाचा एक जवान शहीद होतो, त्यामागे तुमच्या नशेचा पैसा असतो, याचा तुम्ही कधी विचार केला आहे? असे अनेक सवाल मोदींनी उपस्थित केले़