VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 14:10 IST2025-05-05T10:16:10+5:302025-05-05T14:10:29+5:30
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना मदती केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतलेल्या तरुणाचा मृतदेह सापडल्याने काश्मीरमध्ये खळबळ उडाली आहे.

VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांकडून काश्मीरमध्ये जोरदार मोहिम राबवण्यात येत आहे. अशातच नदीच्या किनारी एका काश्मिरी तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याने त्याच्या मृत्यूनंतर आता सुरक्षा दलांवर आरोप करण्यात आले आहेत. मृतदेह सापडल्यानंतर तरुणाचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये तो तरुण सुरक्षा दलांपासून पळून जाताना दिसत आहे. तरुणाने नदीत उडी मारल्याने तो वाहून गेला आणि त्याचा मृत्यू झाला. या तरुणावर दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा आणि मदत करण्याचा आरोप होता. त्यामुळे त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. सध्या या प्रकरणात न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
रविवारी सकाळी काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील अहरबल भागातील अदबल नाल्यातून इम्तियाज अहमद या २३ वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडला. सुरक्षा दलांच्या ताब्यात असताना त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप इम्तियाजच्या कुटुंबीयांनी केला. इम्तियाजला काही दिवसांपूर्वी सैन्याने ताब्यात घेतले होते. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये आणि राजकीय नेत्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दुसरीकडे, इम्तियाज अहमदने स्वतः नदीत उडी मारून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. व्हिडीओमध्ये इम्तियाज नदीत उडी मारताना दिसत आहे. इम्तियाजवर दहशतवाद्यांना जेवण पुरवल्याचा आणि त्यांची राहण्याची व्यवस्था केल्याचा आरोप होता.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, इम्तियाजला दहशतवाद्यांचा ओव्हरग्राउंड वर्कर असल्याच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आले होते. सुरक्षा दलांना दहशतवाद्यांच्या अड्ड्याकडे नेत असताना इम्तियाजने वैष्णो नदीत उडी मारली आणि त्याचा मृत्यू झाला. इम्तियाजचा मृतदेह सापडल्यानंतर काही तासांनी ड्रोन फुटेज समोर आले, ज्यामध्ये एक तरुण अडबाल नाल्यात उडी मारताना दिसत आहे. त्याने दहशतवाद्यांना मदत केल्याची कबुली दिली होती. त्यावेळी तो जंगलातील एका लपण्याच्या ठिकाणी सुरक्षा दलांना घेऊन जात होता. मात्र त्याने पळ काढला आणि नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याचा दावा पोलिसांनी केला.
23-yr-old Imtiaz Ahmad Magray from Kulgam, who confessed to aiding terrorists & was leading security forces to their hideout, jumped into the River to escape, drowning in the process.
— Priti Gandhi (@MrsGandhi) May 4, 2025
So radicalised that he chose to give his life rather than help investigate acts of terror. pic.twitter.com/Ad5dEzmhbu
माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी एक्स पोस्टवरुन याबाबत भाष्य केलं. "कुलगाममधील नाल्यातून आणखी एक मृतदेह सापडला आहे, ज्याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. स्थानिक रहिवाशांचा आरोप आहे की सुरक्षा दलांनी इम्तियाजला दोन दिवसांपूर्वी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते आणि आता त्याचा मृतदेह नाल्यात सापडला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ला हा काश्मीरमधील शांतता बिघडवण्याचा, पर्यटन विस्कळीत करण्याचा आणि देशभरातील सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न होता," असं मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटलं.