मध्य प्रदेशच्या उज्जैन जिल्ह्यातील नागदा येथील एका खासगी रुग्णालयात धक्कादायक घटना समोर आली आहे. चेकअपसाठी आलेला एक तरुण अचानक खाली कोसळला. त्याला हार्ट अटॅक आला पण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने त्या तरुणाचा जीव वाचला आहे.
३० वर्षीय सनी गेहलोत छातीत दुखत असल्याच्या तक्रारीसह नागदा येथील चौधरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये पोहोचला. डॉक्टर त्याचं ब्लड प्रेशर तपासत होते, तेव्हा तो खुर्चीवरून खाली पडला. यानंतर ताबडतोब डॉक्टरांनी सीपीआर आणि इलेक्ट्रिक शॉक थेरपी देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आणि उपचार सुरू केले.
तरुणाला ताबडतोब आयसीयूमध्ये हलवण्यात आले, जिथे त्याला सतत सीपीआर देण्यात आला. डॉक्टरांच्या कष्टाला फळ मिळालं आणि तरुणाचा जीव वाचवण्यात यश आलं आहे. ही संपूर्ण घटना रुग्णालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे, जी आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
डॉक्टर सुनील चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ४० मिनिटं सीपीआर आणि इलेक्ट्रिक शॉक देण्यात आला, त्यानंतर त्या तरुणाच्या हृदयाचे ठोके सुरू झाले. प्राथमिक उपचारानंतर त्याला इंदूर येथे रेफर करण्यात आलं, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रुपेता गावातील रहिवासी सनी गेहलोत छातीत दुखण्याची तक्रार घेऊन चौधरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये पोहोचला. डॉक्टर ओपीडीमध्ये त्याची तपासणी करत असताना अचानक त्याला छातीत तीव्र वेदना जाणवल्या आणि तो खाली पडला. याच दरम्यान, त्याला सुमारे १२ वेळा शॉक देण्यात आला आणि ४० मिनिटं सीपीआर देण्यात आला, ज्यामुळे त्याचा जीव वाचला.