थंडीने वैतागला, चुलीशेजारी झोपला अन् सकाळी घडलं भयंकर; तरुणाचा होरपळून मृत्यू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 13:10 IST2023-12-28T13:06:55+5:302023-12-28T13:10:17+5:30
पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा खोलीत एक तरुण होरपळलेल्या अवस्थेत जमिनीवर आढळून आला.

थंडीने वैतागला, चुलीशेजारी झोपला अन् सकाळी घडलं भयंकर; तरुणाचा होरपळून मृत्यू!
नवी दिल्ली : देशाची राजधानी नवी दिल्ली सध्या थंडीने गारठून गेली आहे. अशातच नवी दिल्लीतील न्यू मंगलापुरी या भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. थंडीपासून वाचण्यासाठी चुलीशेजारी झोपलेल्या एका तरुणाचा होरपळून मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. विनय अरोरा असं ३६ वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, न्यू मंगलापुरी येथील स्थानिकांनी एका खोलीत आग लागली आहे, अशी माहिती बुधवारी सायंकाळी पोलिसांना फोनद्वारे दिली. ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आतून बंद असलेल्या घराचा दरवाजा जळालेला होता. तसंच खोलीत एक तरुण होरपळलेल्या अवस्थेत जमिनीवर आढळून आला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.
आगीत होरपळून मृत्युमुखी पडलेला तरुण एका क्लबमध्ये बाऊन्सर म्हणून करत होता. थंडीमुळे गारठल्याने तो चूल पेटवून शेजारीच झोपल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सदर तरुणाच्या खोलीतील खुर्च्या आणि इतर साहित्यही जळाले असल्याचे आढळून आले.
दरम्यान, पोलिसांसह दिल्ली अग्निशमन केंद्राचे पथक आणि फॉरेन्सिक पथकही घटनास्थळी दाखल झाले होते. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.