S Jaishankar Lord Hanuman Foreign Policy: पुराणातली वांगी पुराणात अशी एक मराठी म्हण आहे. या म्हणीचा अर्थ असा की जुन्या घडून गेलेल्या गोष्टींचा आधुनिक घटनांशी काहीही संबंध लावण्याचा कोणी प्रयत्न करू नये. पण भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मात्र या म्हणीला बगल देत, परराष्ट्र धोरणाचा थेट बजरंग बलीशी संबंध जोडला. दिल्ली विद्यापीठातील साहित्य महोत्सवाच्या कार्यक्रमात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी परराष्ट्र धोरणाबाबत भगवान हनुमानाचा उल्लेख केला. लंकेतील रावणाच्या दरबारातील हनुमानाची भेट याची तुलना जयशंकर यांनी परराष्ट्र कूटनितीशी केली आणि सांगितले की मित्रदेशांची संख्या जास्तीत जास्त वाढवणे हेच भारताचे उद्दिष्ट आहे.
शनिवारी दिल्ली विद्यापीठ साहित्य महोत्सवाच्या कार्यक्रमानिमित्त ते म्हणाले, "हनुमानाचे कर्तृत्व पाहा. त्याला भगवान श्रीरामांनी शत्रूच्या प्रदेशात पाठवले होते. त्याला सांगण्यात आलं होतं की तिथे जा आणि परिस्थितीचा अंदाज घेऊन सीतामातेला भेट. यात सर्वात कठीण भाग होता तो म्हणजे सीतामातेला भेटून तिच्याशी संवाद साधणे आणि तिला धीर देणे. हनुमान प्रत्यक्षात तेथे गेला आणि नंतर मुत्सद्दीपणाने रावणाला शरण गेला. त्यावेळी त्याने रावणाच्या दरबारातील न्यायदानाची पद्धत समजून घेतली."
"जेव्हा तुम्ही परराष्ट्र धोरणाच्या मुत्सद्देगिरीबद्दल बोलता तेव्हा ते कशाबद्दल असते, ही एकप्रकारची सामान्यज्ञानाची बाब आहे. तुमच्या मित्रांची संख्या कशी वाढवायची? तुम्ही त्यांना कोणत्याही कामासाठी कसा प्रस्ताव देता? तुम्ही त्याचे व्यवस्थापन कसे करता? याबाबी लक्षात घ्यायला हव्यात. कारण कधीकधी तुमच्याकडे लोकांचा एक मोठा गट असतो, अशा वेळी तुम्ही त्या सर्वांना कसे एकत्र कसे ठेवता हे महत्त्वाचे आहे. आज आपण भारतात मित्रराष्ट्रांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही वेगवेगळ्या देशांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहोत," अशी भूमिका त्यांनी मांडली.