योगगुरुचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; 11 तासांत 100 किलोमीटर धावून केलेला विक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 19:28 IST2025-03-24T19:25:07+5:302025-03-24T19:28:05+5:30
दररोज 50 ते 70 किमी धावणे आणि दोन ते तीन हजार सूर्यनमस्कार करणे, हे त्यांच्यासाठी नित्याचेच असायचे.

योगगुरुचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; 11 तासांत 100 किलोमीटर धावून केलेला विक्रम
Madhya Pradesh : मध्य प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील अशोकनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध पशुवैद्य आणि योगगुरू डॉ. पवन सिंघल यांचे सोमवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते शादोरा येथील तुळशी सरोवर उद्यानाजवळ योगासन करण्यासाठी जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. स्थानिकांनी त्यांना बेशुद्धावस्थेत जवळच्या जिल्हा रुग्णालयात नेले, पण तोपर्यंत उशीर झाला होता.
डॉ. पवन सिंघल हे एका दशकाहून अधिक काळापासून योगाचा सक्रियपणे प्रचार करत होते. योगा क्षेत्रातील त्यांच्या निपुणतेसाठी ते शहरात सर्वत्र प्रसिद्ध होते. 2022 मध्ये त्यांनी केवळ 11 तासांत 100 किमी धावून मोठा पराक्रम गाजवला होता. दररोज 50 ते 70 किमी धावणे आणि दोन ते तीन हजार सूर्यनमस्कार करणे, हे त्यांच्यासाठी नित्याचेच असायचे. ज्या लोकांना त्यांनी योग शिकवला, त्यांनाही सिंघल यांनी नियमित धावण्यासाठी प्रोत्साहित केले.
Video: तरुण नेता मॉर्निंग वॉकवरून आला आणि अंगणातच मृत्यूनं गाठलं!
डॉ. पवन सिंघल हे गेल्या 5-6 वर्षांपासून अशोकनगर येथील तुळशी सरोवर येथे 'पतंजली कायकल्प योग इनिशिएटिव्ह' अंतर्गत योगाचे वर्ग घेत होते, ज्यामुळे अनेकांना शिस्तबद्ध जीवनशैली अंगीकारण्याची प्रेरणा मिळाली. स्वत:ची काळजी आणि निरोगीपणाच्या महत्त्वावर भर देणारी सत्रे नियमितपणे आयोजित करण्यासाठी ते ओळखले जायचे.आकस्मिक निधनाच्या एक दिवस आधी त्यांनी सोशल मीडियावर नवदुर्गादरम्यान होणाऱ्या योग आणि यज्ञ विधींची माहिती दिली होती.
त्यांच्या आकस्मिक निधनाने सध्या सर्वांनाच धक्का बसला आहे. योगासने करणाऱ्या लोकांनाही हार्ट अटॅक कसा येऊ शकतो? असा प्रश्न विचारला जात आहे.