येडियुरप्पांनी मोदी स्टाईलमध्ये केला विधानसभेत प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2018 13:25 IST2018-05-17T13:24:47+5:302018-05-17T13:25:52+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 साली लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर संसदेच्या पायरीसमोर नतमस्तक होऊन सभागृहात प्रवेश केला होता.

येडियुरप्पांनी मोदी स्टाईलमध्ये केला विधानसभेत प्रवेश
बंगळुरू: सर्वोच्च न्यायालयाने शपथविधी रोखण्यास नकार दिल्यानंतर भाजप नेते येडियुरप्पा यांनी अखेर गुरूवारी सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शपथ घेतल्यानंतर विधानसभेतला येडियुरप्पांचा मोदी स्टाईल प्रवेशही तितकाच गाजला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 साली लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर संसदेच्या पायरीसमोर नतमस्तक होऊन सभागृहात प्रवेश केला होता. येडियुरप्पा यांनी आज मोदींच्या याच कृतीची नक्कल केली. विधानसभेच्या पायऱ्यांवर डोके टेकवून ते सभागृहात गेले. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांच्यासह पक्षाचे अनेक नेते होते.
देवभक्त असलेल्या येडियुरप्पांनी शपथविधीपूर्वी राधा-कृष्ण मंदिरात जाऊन दर्शन घेतले. येडियुरप्पा राजभवनात पोहोचले तेव्हा भाजपच्या कार्यकर्त्यांनी राजभवनाबाहेर प्रचंड जल्लोष केला. 'मोदी-मोदी' आणि 'वंदे मातरम'च्या घोषणा देत आणि ढोल-ताशे वाजवत भाजप कार्यकर्त्यांनी येडियुरप्पा यांचे स्वागत केले. अनेक कार्यकर्ते पारंपारिक वेशभूषा करून आले होते.