Yasin Malik Controversy: जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट (JKLF) चा दहशतवादी यासिन मलिक याने एक खळबळजनक दावा केला आहे. मलिकने २००६ मध्ये लष्कर-ए-तैयबाचा संस्थापक आणि २६/११ चा मास्टरमाइंड हाफिज सईदची पाकिस्तानात भेट घेतली होती. या भेटीबद्दल भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मलिकचे वैयक्तरित्या आभार मानले होते, असा दावा त्याने केला आहे.
सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या यासिन मलिकने २५ ऑगस्ट २०२५ रोजी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले की, आयबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच मलिकला २००६ मध्ये पाकिस्तानात पाठवले होते. हाफिज सईदची भेट खासगी नव्हती, तर पाकिस्तानसोबतच्या शांतता प्रक्रियेचा भाग होती.
गुप्तचर विभागाची कथित भूमिका...
यासिन मलिकच्या दाव्यानुसार, त्याच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वी गुप्तचर विभागाचे (आयबी) तत्कालीन विशेष संचालक व्ही.के. जोशी यांनी त्याची दिल्लीत भेट घेतली होती. जोशी यांनी मलिकला या संधीचा वापर करुन तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या शांतता प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी पाकिस्तानी राजकीय नेत्यांसह हाफिज सईदशी संवाद साधण्याचे आवाहन केले होते.
अमित मालवीय यांची पोस्ट...
भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये यासिन मलिकने दाखल केलेले प्रतिज्ञापत्राचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहेले, "यासिन मलिकने धक्कादायक दावा केला आहे. हा दावा खरा असेल, तर UPA सरकारच्या काळातील राष्ट्रीय सुरक्षा आणि डिप्लोमसीवर गंभीर प्रश्न उपस्थित करतात."
आपली फसवणूक झाल्याचा मलिकचा दावा
मलिकने आपल्या प्रतिज्ञापत्रात अटलबिहारी वाजपेयी, सोनिया गांधी, पी. चिदंबरम, आय.के. गुजराल आणि राजेश पायलट यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या भेटी आणि बैठकींचा विस्ताराने उल्लेख केला आहे. १९९० मध्ये माझ्या अटकेनंतर मी व्ही.पी. सिंह, चंद्रशेखर, पी.व्ही. नरसिंह राव, एच.डी. देवगौडा, इंदरकुमार गुजराल आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सलग सहा सरकारांमध्ये सक्रियपणे सहभागी होतो.
दरम्यान, याच प्रतिज्ञापत्रातून मलिकने आपली फसवणूक झाल्याचा दावा केला आहे. मी सरकारच्या विनंतीवरुन शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानला गेलो होतो. पण, या दौऱ्यानंतर 13 वर्षांनी या भेटीचा संदर्भ बदलून माझ्यावर UAPA अंतर्गत कारवाई करण्यात आली आणि मला दहशतवादी ठरवून तुरुंगात टाकले. माझे हेतू वाईट असते, तर मी कधीही कायदेशीररीत्या पाकिस्तानला गेलो नसतो, असेही त्याने यात म्हटले आहे. मलिकच्या दाव्यावरुन देशात नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.