यशवंत बागडेंना समन्स
By Admin | Updated: January 22, 2015 00:07 IST2015-01-22T00:07:19+5:302015-01-22T00:07:19+5:30
हायकोर्ट : एनडीसीसी बँक घोटाळा चौकशीचे प्रकरण

यशवंत बागडेंना समन्स
ह यकोर्ट : एनडीसीसी बँक घोटाळा चौकशीचे प्रकरणनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळ्याची पहिली चौकशी करणारे अधिकारी यशवंत बागडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावून नवीन चौकशी अधिकारी डॉ. सुरेंद्र खरबडे यांना वारंवार मागणी करूनही चौकशीचा रेकॉर्ड का हस्तांतरित केला नाही यावर २८ जानेवारी रोजी व्यक्तीश: उपस्थित राहून स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिलेत.राज्य शासनाने १६ जून २०१४ रोजीच्या आदेशान्वये डॉ. खरबडे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. यशवंत बागडे सहकार्य करीत नसल्यामुळे डॉ. खरबडे यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. अर्जातील माहितीनुसार, खरबडे यांनी १९ जूनपासून चौकशी सुरू करून विभागीय सहकारी सहनिबंधकांना बागडे यांनी केलेल्या चौकशीचा रेकॉर्ड मागितला होता. तसेच, बागडे यांनाही अनेकदा विनंती केली होती. परंतु, त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. शासन व बागडे यांच्या असहकारामुळे निर्धारित कालावधीत चौकशी पूर्ण करणे अशक्य झाल्याची तक्रार खरबडे यांनी अर्जात केली आहे. तसेच, बागडे यांनी चौकशीचा रेकॉर्ड हस्तांतरित करावा, असे निर्देश देण्याची विनंती केली आहे.२३ डिसेंबर २०१४ रोजी उच्च न्यायालयाने ओमप्रकाश कामडी व इतरांची जनहित याचिका निकाली काढताना घोटाळ्याची चौकशी ६ महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. घोटाळ्यातील आरोपींमध्ये बँकेचे माजी अध्यक्ष आमदार सुनील केदार, माजी महाव्यवस्थापक अशोक चौधरी (नागपूर), रोखे दलाल संजय अग्रवाल, केतन सेठ, सुबोध भंडारी, कानन मेवावाला, नंदकिशोर त्रिवेदी (सर्व मुंबई), अमित वर्मा (अहमदाबाद), महेंद्र अग्रवाल, श्रीप्रकाश पोद्दार (कोलकाता) व बँक कर्मचारी सुरेश पेशकर या ११ जणांचा समावेश आहे.