भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 06:35 IST2025-12-18T06:35:18+5:302025-12-18T06:35:40+5:30
भारतीय मिठाईचा गोडवा आता केवळ देशापुरता मर्यादित न राहता सातासमुद्रापार पोहोचला आहे.

भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
नवी दिल्लीः भारतीय मिठाईचा गोडवा आता केवळ देशापुरता मर्यादित न राहता सातासमुद्रापार पोहोचला आहे. जगभरातील खाद्यपदार्थांचे मानांकन करणाऱ्या 'टेस्ट अॅटलस' या प्रतिष्ठित वेबसाइटने जगातील सर्वोत्तम ९७ हजार पदार्थांच्या रेटिंग्सचा अभ्यास करून एक यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारताच्या 'कुल्फी' व 'फिरनी' या दोन पारंपरिक पदार्थानी बाजी मारली आहे.
जागतिक स्तरावर मिळत असलेली ही ओळख भारताच्या समृद्ध पाककृतीची साक्ष देते. मुघल काळापासून जपलेला हा वारसा आजही ओळख टिकवून आहे.
कुल्हडमधील गोडवा
'फिरनी'ने या यादीत ६० वे स्थान मिळवले आहे. तांदूळ आणि दुधाचा हा अप्रतिम संगम जगभरातील खवय्यांच्या पसंतीस उतरला आहे. कुल्हडमध्ये मिळणारी सुका मेवा आणि केशराचा सुरेख मिलाफ असणारी ही फिरनी मोहात पाडणारी अशीच आहे.
मुघल काळापासूनचा 'क्रीमी' वारसा
या यादीत कुल्फीला ४९ व्या स्थानावर स्थान मिळाले आहे. भारतीय आईस्क्रीम म्हणून ओळखली जाणारी कुल्फी ही केवळ एक गोड पदार्थ नसून तो एक समृद्ध इतिहास आहे. कुल्फीचा उगम मुघल काळात झाल्याचे मानले जाते.
९७ हजार रेटिंग्समधून करण्यात आली निवड
ही यादी केवळ तज्ज्ञांच्या मतावर नव्हे, तर जगभरातील खवय्यांनी दिलेल्या २७,००० हून अधिक वैध रेटिंग्सवर आधारित आहे. या यादीत तुर्कीच्या 'अंताक्या कुनेफेसी' या पदार्थाने प्रथम तर इंग्लंडची 'क्लॉटेड क्रीम आईस्क्रीम' दुसऱ्या क्रमांकावर आहे. या जागतिक स्पर्धेत भारतीय मिठाईने स्थान निर्माण करणे ही अभिमानास्पद बाब आहे.
जागतिक यादीतील टॉप ३ पदार्थ
१. अंताक्या कुनेफेसी (तुर्की)
२. क्लॉटेड क्रीम आइस्क्रीम (इंग्लंड)
३. जेलाटो (इटली)