कामगार मानवी हक्क आयोगाकडे जाणार
By Admin | Updated: December 22, 2014 23:11 IST2014-12-22T23:11:57+5:302014-12-22T23:11:57+5:30
संप चालूच : कचरा कुजू लागला, दुर्गंधी पसरू लागली

कामगार मानवी हक्क आयोगाकडे जाणार
स प चालूच : कचरा कुजू लागला, दुर्गंधी पसरू लागलीपणजी : संपकरी मनपा कामगार आता राज्य तसेच राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे दरवाजे ठोठावणार आहेत. सोमवारी राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेण्याची तयारीही कामगार नेत्यांनी चालवली आहे. संपाचा परिणाम तीव्रतेने जाणवू लागला आहे. शहरात काही ठिकाणी कचरा साठल्याचे रविवारीही दिसले. अनेक ठिकाणी कचर्याची दुर्गंधीही पसरू लागली आहे. तसेच घराघरांतील कचराही पडून राहिला आहे. आंदोलकांचे नेतृत्व करणारे गोवा ट्रेड युनियन कॉन्फिडरेशनचे अध्यक्ष ॲड. अजितसिंह राणे यांनी मनपाच्या ३३३ कामगारांना बडतर्फ करण्याच्या निर्णयावर संताप व्यक्त केला. या कामगारांच्या अन्न, वस्त्र, निवार्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. महापालिका हा सरकारचाच भाग आहे. सरकारच्या कोणत्याही कृतीमुळे माणूस अन्न, वस्त्र, निवार्यापासून वंचित होत असेल तर मानवी हक्क आयोगाला त्याची गंभीर दखल घ्यावीच लागेल, असे ते म्हणाले. १४४ कलमाचा धाक दाखवून आझाद मैदानावरून हटविल्यानंतर या कामगारांनी आता आपले बस्तान गोवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात हलविण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात जिल्हाधिकार्यांनी लागू केलेल्या १४४ कलमालाच आता न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय कामगार नेत्यांनी घेतला आहे. ॲड. राणे म्हणाले की, नाताळनिमित्त संप स्थगित करावा, अशी मागणी होऊ लागल्याने संप स्थगितीसाठी वाटाघाटी चालू होत्या; परंतु मनपाने कोणालाही विश्वासात न घेताच कामगारांना बडतर्फ केले. हा घोर अन्याय आहे. बडतर्फीनंतर काही कामगार महिला बेमुदत उपोषणाच्या तयारीत होत्या; परंतु आपणच त्यांना त्यापासून परावृत्त केले. त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन गेलेले आहे. सरकारने त्यांचा अंत पाहू नये. (प्रतिनिधी) चौकटभाडोत्री कामगार अपुरे मनपाने भाडोत्री कामगार घेतलेले असले तरी कचरा उचलीबाबतीत ते कमीच पडताहेत. शहरात सांतइनेज स्मशानभूमीजवळ, जुन्या सचिवालयाच्या मागे तसेच बाजारपेठेतही काही ठिकाणी कचरा तसाच पडून होता. रात्रीच्या वेळी मांडवीच्या पात्रात कचरा फेकण्याचे प्रकार घडत आहेत. अनेक हॉटेलवाले, व्यापारी कचर्याच्या पिशव्या भरून रस्त्यावर ढिग करत आहेत. तेथे मोकाट कुत्री, जनावरे अन्नाच्या शोधात येतात आणि तो कचरा रस्त्यावर पसरतो आहे. अनेक ठिकाणी दुर्गंधीही पसरली आहे. प्रचंड कचरा आणि अपुरे भाडोत्री कामगार, असे चित्र आहे.