राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 09:12 IST2025-10-28T07:02:08+5:302025-10-28T09:12:34+5:30
मुख्य मंदिराच्या आसपासच्या सहा मंदिरांवर ध्वजदंड व कलशही स्थापन करण्यात आला आहे

राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
अयोध्या : राम जन्मभूमी मंदिराचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण झाल्याची घोषणा सोमवारी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने केली आहे. ‘एक्स’ या सोशल मीडियावर यासंदर्भात ट्रस्टकडून माहिती देण्यात आली. राम मंदिराचे काम पूर्ण झाल्याची माहिती सर्व रामभक्तांना आपण देतोय याचा अत्यंत आनंद होतोय, असे ट्वीट ट्रस्टकडूून करण्यात आले आहे. मंदिर निर्माणाव्यतिरिक्त भाविकांसाठी पूजा प्रार्थनेची सोय, फुटपाथ, दर्शनाचा भाग, भाविकांचा ओघ नियंत्रित करण्याच्या व्यवस्थाही पूर्ण करण्यात आल्या आहेत. १० एकरचा पंचवटी भाग जवळपास पूर्ण करत आणला आहे.
महत्त्वाच्या सहा मंदिरांचेही काम पूर्ण
२२ जानेवारी २०२४ राम जन्मभूमी मंदिरात भगवान रामाची प्राणप्रतिष्ठा झाली असली तरी या मंदिराच्या आसपासचे बरेचसे काम अपूर्ण होते. आता मुख्य मंदिराच्या आसपासची भगवान शिव, भगवान गणेश, भगवान हनुमान, सूर्यदेव, देवी भगवती, देवी अन्नपूर्णा मंदिर पूर्ण झाले आहे.
सप्त मंडपही झाले तयार
मुख्य मंदिराच्या आसपासच्या सहा मंदिरांवर ध्वजदंड व कलशही स्थापन करण्यात आला आहे. तसेच महर्षी वाल्मिकी, वशिष्ठ, विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, निषादराज, शबरी आणि अहिल्या मंदिर सप्त मंडपाचेही काम पूर्ण झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण
आता संपूर्ण राम मंदिराचे काम पूर्ण झाल्यानंतर मुख्य मंदिरावर ध्वजारोहणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २५ नोव्हेंबरला अयोध्येत येत आहेत. त्यावेळी हा सोहळा सुमारे ६ ते ८ हजार निमंत्रितांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणावर आयोजित केला जाणार आहे.
मंदिराच्या पहिल्या मजल्यावर ‘राम परिवार’ आसनस्थ झाला असून मोदी येथे बसून आरती करणार आहेत. त्यानंतर मंदिराच्या शीर्षस्थानी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करणार असल्याचे ट्रस्ट संचालकांनी सांगितले.