उत्तर प्रदेशमधील बागपत जिल्ह्यात एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान, मोठी दुर्घटना घडली आहे. येथे भगवान आदिनाथ यांच्या निर्वाण लड्डू पर्वादरम्यान ही दुर्घटना घडली. कार्यक्रमासाठी मान स्तंभ परिसरात उभारण्यात आलेला मंच कोसळल्याने त्याखाली सुमारे ५० भाविक दबले गेले. या दुर्घटनेत आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमी भाविकांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत.
ही दुर्घटना बागपतमधील बडौत येथे आयोजित जैनन निर्वाण महोत्सवादरम्यान घडली. जैन कॉलेज फिल्डमध्ये आदिनाथ भगवान यांच्याशी संबंधित एक कार्यक्रम सुरू असताना ही दुर्घटना घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेला मंच कोसळला. त्यात काही महिला भाविकांसह, पुरुष आणि लहान मुलंही जखमी झाली. जखमींना उपचारांसाठी त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आदिनाथ भगवान यांच्या निर्वाण महोत्सवामध्ये ६५ फूट उंच मान स्तंभावर निर्वाण लाडू अर्पण करण्यासाठी ६५ फूट उंच मंच तयार करण्यात आला होता. यादरम्यान, ही भीषण दुर्घटना घडली. त्यात अनेक भाविक जखमी झाले. सध्या घटनास्थळी मदतकार्य सुरू असून, बागपत जिल्हा रुग्णालयाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, या दुर्घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन तत्काळ मदतकार्य सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच रुग्णालयात जाऊन जखमींवर योग्य ते उपचार होतील, याची व्यवस्था करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.