CoronaVirus News: लसनिर्मिती मोहिमेचे नेतृत्व महिलेकडे; ऑक्सफर्डमधील योद्धा सारा गिल्बर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 06:40 IST2020-07-21T23:42:42+5:302020-07-22T06:40:08+5:30
काही महिन्यांत मिळवले यश

CoronaVirus News: लसनिर्मिती मोहिमेचे नेतृत्व महिलेकडे; ऑक्सफर्डमधील योद्धा सारा गिल्बर्ट
नवी दिल्ली : कोरोना विषाणूंच्या विरोधात ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेली लस माणसांसाठी सुरक्षित असल्याचे निष्कर्ष आले आहेत. त्यासाठी झालेल्या संशोधनाचे नेतृत्व सारा गिल्बर्ट या ५८ वर्षांच्या महिलेने केले.
ऑक्सफर्डने विकसित केलेली लस परिणामकारक असल्याचे निष्पन्न झाले आहे. सीएचएडीएक्स-१ ही विद्यापीठाची कोरोना प्रतिबंधक लस प्रभावी दिसून आली आहे. या लसीमुळे शरीरात अँटिबॉडी आणि टी सेल विकसित होत असल्याचे समोर आले आहे. लसनिर्मिती मोहिमेत सारा गिल्बर्ट यांचा खूप मोठा वाटा आहे. सारा यांच्या नेतृत्वाखाली शेकडो संशोधकांच्या पथकाला यश मिळाले आहे. लसीच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्याचे नेतृत्वही त्या करीत आहेत.
कोरोनापासून वाचवण्यासाठी ही लस ८० टक्के प्रभावी असलेली ही यश सप्टेंबरपर्यंत बाजारात येईल. काही लसी संसर्गाला थांबवत नाहीत, पण आजारापासून बचावासाठी इम्युन सिस्टिम विकसित करतात, असे सारा म्हणाल्या.
कोविड-१९ च्या बाबतीत सारा यांनी एक चिपँझी एडिनोव्हायरस (एक निष्क्रिय विषाणू) घेतला. त्यानंतर जेनेटिक मटेरियल सार्स- सीओव्ही-२ व्हायरसच्या स्पाइक प्रोटिनच्या माध्यमातून इन्सर्ट केले त्यांनी ब्रुइंग रिसर्च फाउंंडेशनमधून सुरुवात करून विविध कंपन्यांत काम करीत औषध निर्मितीचे शिक्षण घेतले.
१९९४ मध्ये ऑक्सफर्डच्या प्रोफेसर एड्रियन हिल्स लॅबमध्ये त्या दाखल झाल्या. तिथे त्यांनी जेनेटिक्स आणि मलेरियावर काम केले. त्यांनी १९९८ मध्ये तिळ्या मुलांना जन्म दिला, पण केवळ १८ आठवड्यांची सुटी घेऊन त्या कामावर हजर झाल्या होत्या. त्या २००४ मध्ये विद्यापीठात प्रपाठक बनल्या. त्यानंतर तीन वर्षांतच त्यांना पहिला फ्लू व्हॅक्सिन प्रोजेक्ट मिळाला. वेलकम ट्रस्टकडून मिळालेल्या या प्रोजेक्टमध्ये सारा यांनी टीमचे नेतृत्व केले होते.
स्वत:च्या तिन्ही मुलांवरही चाचणी
कोरोनावरील लस विकसित होत असताना सारा यांनी आपल्या तिन्ही मुलांनाही चाचणीमध्ये सहभागी करून घेतले. तसेच प्रयोगात्मक लस त्यांना टोचून त्याचे परीक्षण केले. लसीची स्वत:च्या मुलांवर चाचणी घेताना आपल्याला अजिबात भीती वाटली नाही, असे सारा सांगतात.