...तर बलात्काऱ्यांना जिवंत जाळलं पाहिजे; गुजरातमधल्या काँग्रेसच्या महिला आमदाराचा उद्वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 03:48 PM2018-10-12T15:48:03+5:302018-10-12T15:53:45+5:30

गुजरातमध्ये गेल्या दोन आठवड्यांपूर्वी 14 महिन्यांच्या मुलीवर झालेल्या कथित बलात्काराच्या घटनेनं वातावरण ढवळून निघालं आहे.

women congress mla in gujarat said rape accused should be burnt alive | ...तर बलात्काऱ्यांना जिवंत जाळलं पाहिजे; गुजरातमधल्या काँग्रेसच्या महिला आमदाराचा उद्वेग

...तर बलात्काऱ्यांना जिवंत जाळलं पाहिजे; गुजरातमधल्या काँग्रेसच्या महिला आमदाराचा उद्वेग

अहमदाबाद- गुजरातमध्ये गेल्या दोन आठवड्यांपूर्वी 14 महिन्यांच्या मुलीवर झालेल्या कथित बलात्काराच्या घटनेनं वातावरण ढवळून निघालं आहे. या प्रकारानंतर सत्ताधारी आणि विरोधकांनीही एकमेकांवर चिखलफेक केली आहे. आता गुजरातमधल्या काँग्रेसच्या आमदार गेनिबेन ठाकोर यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. बलात्कार करणा-या आरोपीला पोलिसांच्या हवाली करण्यापेक्षा जिवंत जाळलं पाहिजे.

या विधानाचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर आता ठाकोर यांनी या विधानावर सारवासारवीची भूमिका घेतली आहे. महिलांना शांत करण्यासाठी मी असं विधान केलं होतं, असंही त्या महिला आमदार म्हणाल्या आहेत. ठाकोर या बनासकांठा जिल्ह्यातील वाव भागाचं प्रतिनिधित्व करतात. त्या वादग्रस्त विधान करत असल्याचा व्हिडीओ मोबाईलवरून बनवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तसेच या व्हिडीओमध्ये त्या महिलांच्या मध्ये उभ्या असून असं विधान करत असल्याचं दिसतंय. व्हिडीओत ठाकोर म्हणतायत, भारतात प्रत्येकालाच कायद्याच्या प्रक्रियेतून जावं लागतं. परंतु जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा 50-150 लोकांना एकत्र यायला हवं. बलात्कार करणा-या त्या आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन न करता जिवंत जाळलं पाहिजे.

या विधानांवरून वाद झाल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे. 28 सप्टेंबर रोजी घडलेल्या घटनेनंतर मी महिलांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते. आरोपींना त्याच दिवशी पोलिसांनी अटक केली आहे. तो बिहारचा नागरिक आहे. व्हिडीओ माझ्या घरामध्ये तयार करण्यात आला आहे. हे कोणतंही सार्वजनिक रॅली किंवा संमेलन नव्हतं. मी जवळपास 100 महिलांना शांत करण्यासाठी असं विधान केलं होतं. त्याशिवाय माझा कोणताही उद्देश नव्हता. 

काय आहे प्रकरण ?
गुजरातच्या साबरकांठा येथे 28 सप्टेंबर रोजी 14 महिन्यांच्या चिमुकलीवर एका बिहारी कामगाराने बलात्कार केला होता. त्यानंतर नेहमीच शांत, संयमी असलेल्या गुजरातींचाही राग अनावर झाला. त्यामुळे युपी-बिहारी नागरिकांना गुजरात सोडून देण्याचा इशारा देण्यात आला. विशेष म्हणजे गुजरातमधील 11 जिल्ह्यांत ही मोहीम तीव्र झाली असून अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत 50 हजार उत्तर भारतीयांनी गुजरात सोडल्याची माहिती आहे.  

Web Title: women congress mla in gujarat said rape accused should be burnt alive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.