CoronaVirus: मोदी सरकार आजपासून बँक खात्यात पैसे जमा करणार; २० कोटी महिलांना लाभ मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 14:15 IST2020-04-03T14:14:19+5:302020-04-03T14:15:58+5:30
CoronaVirus पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून बँक खात्यात पैसे जमा करणार

CoronaVirus: मोदी सरकार आजपासून बँक खात्यात पैसे जमा करणार; २० कोटी महिलांना लाभ मिळणार
नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला. त्यामुळे जनजीवन ठप्प झालं. याचा सर्वाधिक फटका हातावर पोट असलेल्या गरिबांना बसत आहे. अशा कुटुंबांना सहाय्य करण्यासाठी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गरीब महिलांच्या जनधन खात्यांमध्ये दर महिन्याला ५०० रुपये जमा केले जाणार आहेत. आजपासून हे पैसे जमा केले जातील. जवळपास २० कोटी महिलांना याचा लाभ मिळेल.
आजपासून महिलांच्या जनधन खात्यांमध्ये ५०० रुपये जमा करण्याचे आदेश इंडियन बँक असोसिएशननं (आयबीए) दिले आहेत. ३ ते ९ एप्रिल दरम्यान पैसे बँक खात्यात भरण्याची प्रक्रिया चालेल. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत पुढील तीन महिने महिलांच्या खात्यात प्रत्येकी ५०० रुपये जमा होतील. यात कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी महिलांच्या खात्याचा शेवटचा क्रमांक लक्षात घेण्यात येईल आणि त्यानुसार ३ ते ९ एप्रिल दरम्यान पैसे जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
कोणत्या जनधन बँक खात्यात कधी येणार पैसे?
- खाते क्रमांकाच्या शेवटी ० किंवा १ आकडा असल्यास त्यांच्या खात्यात आज म्हणजेच ३ एप्रिल रोजी पैसे जमा होतील.
- खाते क्रमांकाच्या शेवटी २ किंवा ३ आकडा असल्यास त्यांच्या खात्यात ४ एप्रिल रोजी पैसे जमा होतील.
- खाते क्रमांकाच्या शेवटी ४ किंवा ५ आकडा असल्यास त्यांच्या खात्यात ७ एप्रिल रोजी पैसे जमा होतील.
- खाते क्रमांकाच्या शेवटी ६ किंवा ७ आकडा असल्यास त्यांच्या खात्यात ८ एप्रिल रोजी पैसे जमा होतील.
- खाते क्रमांकाच्या शेवटी ८ किंवा ९ आकडा असल्यास त्यांच्या खात्यात ९ एप्रिल रोजी पैसे जमा होतील.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बँकांनी सोशल डिस्टन्सिंगकडे विशेष लक्ष दिलं आहे. बँकांनी त्यांच्या खातेधारकांचा खाते क्रमांक लक्षात घेऊन एक वेळापत्रक आखलं आहे. त्याच्या आधारे खातेधारक त्यांच्या खात्यातून पैसे काढू शकतात. हे वेळापत्रक याच महिन्यात लागू करण्यात येईल, अशी माहिती बँकांनी दिली आहे.