दुधासाठी सतत रडणा-या बाळावर चिडली आई, कोयत्याने गळा कापून केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2018 14:45 IST2018-02-09T14:43:58+5:302018-02-09T14:45:08+5:30
दुधासाठी रडणा-या आपल्याच एक वर्षाच्या चिमुरडीची महिलेने कोयत्याने गळा कापून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

दुधासाठी सतत रडणा-या बाळावर चिडली आई, कोयत्याने गळा कापून केली हत्या
भोपाळ - एकवेळ आपलं पोट रिकामं ठेवून तोंडातला घास काढून देते ती आई. आपल्या मुलांसाठी कोणत्याही प्रकारचं आव्हान स्विकरण्यास आई तयार असते. पण मध्य प्रदेशात एका महिलेने आईच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारं कृत्य केलं आहे. दुधासाठी रडणा-या आपल्याच एक वर्षाच्या चिमुरडीची महिलेने कोयत्याने गळा कापून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील धार गावात ही घटना घडली आहे. दूध न मिळाल्याने बाळ वारंवार रडत होतं. अशावेळी आपल्या बाळाची भूक मिटवण्याऐवजी महिलेने तिची गळा कापून हत्या केली. घटनेच्या चार तासानंतर भोपाळमधून आरोपी महिलेला अटक करण्यात आली.
महिलेने बाळाची हत्या केली तेव्हा तिथे कोणीही उपस्थित नव्हतं. हत्या करण्यासाठी महिलेने कोयत्याचा वापर केला. बाळ सतत रडत असल्याचं शेजा-यांनाही ऐकू जात होतं. मात्र काही वेळानंतर हा आवाज अचानक बंद झाल्याने त्यांना संशय आला. सोबत महिला घरात स्वताला कोंडून घेताना आणि नंतर घरातून बाळाशिवाय निघतानाही त्यांनी पाहिलं होतं. आरोपी महिला नातेवाईकाच्या घरी निघून गेली होती.
आरोपी महिलेच्या एका नातेवाईकाला काहीतरी संशयास्पद झालं असल्याचा संशय आला. त्याने शेजा-यांसोबत घरात जाऊन पाहणी केली. घरात गेल्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं बाळ पाहून सर्वांनाच धक्का बसला. यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवलं.
'महिला किचनमध्ये काम करत असताना बाळ दुधासाठी रडत होतं. यामुळे महिला चिडली आणि तिचा संताप झाला. तिने कोयता घेतला आणि बाळावर एकामागोमाग एक वार केले', अशी माहिती पोलीस अधिकारी सी बी सिंग यांनी दिली आहे.