निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 15:04 IST2025-10-27T15:02:50+5:302025-10-27T15:04:10+5:30
लखनौमधील काकोरी कम्युनिटी हेल्थ सेंटर (सीएचसी) येथे आरोग्य विभागाचा मोठा निष्काळजीपणा उघडकीस आला आहे.

फोटो - आजतक
लखनौमधील काकोरी कम्युनिटी हेल्थ सेंटर (सीएचसी) येथे आरोग्य विभागाचा मोठा निष्काळजीपणा उघडकीस आला आहे. सिझेरियन प्रसूतीनंतर दाखल झालेल्या महिलेला कर्मचाऱ्यांनी एक्सपायर झालेलं ग्लुकोज दिलं. ग्लुकोज लावल्यानंतर लगेचच महिलेची प्रकृती बिघडली आणि तिच्या तोंडातून फेस येऊ लागला. यानंतर कुटुंबातील सदस्यांनी गोंधळ घातला. गंभीर अवस्थेत महिलेला क्वीन मेरी हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आलं.
शनिवारी सकाळी सिझेरियन झाल्यानंतर काकोरी येथील रहिवासी काजोल श्रीवास्तवला वॉर्डमध्ये हलवण्यात आलं. रविवारी पहाटे ४ वाजता काजोलची प्रकृती अचानक बिघडल्याचं नीरज श्रीवास्तव यांनी सांगितलं. कुटुंबीयांना ग्लुकोजची बाटली दिसली त्यांनी त्यावर एक्स्पायर डेट पाहिली. हे पाहून धक्काच बसला. कर्मचाऱ्यांनी इंजेक्शन देऊन तिची प्रकृती सुधारण्याचा प्रयत्न केला, परंतु तिची प्रकृती आणखी बिघडली.
निष्काळजीपणामुळे संतप्त झालेल्या कुटुंबाने सीएचसीमध्ये गोंधळ घातला आणि ११२ वर फोन केला. काजोल आणि इतर तीन रुग्णांनाही तेच एक्सपायर्ड ग्लुकोज देण्यात येत असल्याचा गंभीर आरोप नीरज श्रीवास्तव यांनी केला. त्यांनी संपूर्ण घटनेचा व्हिडीओ काढला आणि दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत मुख्यमंत्री पोर्टलवर तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.
सीएचसीचे प्रभारी डॉ. केडी. मिश्रा यांनी महिलेला एक्सपायर्ड ग्लुकोज दिल्याचं मान्य केलं. त्यांनी कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. सीएमओने या प्रकरणावर तात्काळ कारवाई केली आणि दोन सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली. समितीने कुटुंबातील सदस्यांचे जबाब नोंदवले आहेत. तपास अहवालाच्या आधारे निष्काळजी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.